Pune : पीच परफेक्ट’मधून आठ स्वयंसेवी संस्थांसाठी ‘एसव्हीपी’ने उभारला सव्वा दोन कोटींचा निधी

एमपीसी – न्यूज सोशल व्हेंचर पार्टनर्स (एसव्हीपी) इंडियाच्या (Pune)पुणे चॅप्टरने ‘पीच परफेक्ट’ या अनोख्या उपक्रमातून आठ स्वयंसेवी संस्थांसाठी सव्वा दोन कोटींपेक्षा अधिक निधी उभारला.

समाजातील 100 हुन अधिक दानशूर व परोपकारी व्यक्ती, उद्योग क्षेत्रातील मान्यवरांसमोर आठ एनजीओंनी आपल्या कार्याचे सादरीकरण केले. उपस्थित दात्यांनी मदतीचा हात सढळ करत चांगल्या कामासाठी देणगी दिली.

‘एसव्हीपी’ने पुण्यातील आठ स्वयंसेवी संस्थांची निवड(Pune) करून त्यांना दोन महिन्यांचे प्रशिक्षण दिले होते. पाच मिनिटांत आपल्या कार्याची गोष्ट प्रभावीपणे कशी सांगावी, दस्तावेजीकरण, आर्थिक मदतीचे आवाहन अशा मुद्यांचे हे प्रशिक्षण होते. कृषी, महिला सक्षमीकरण, कौशल्य विकास, उच्च शिक्षण, प्राणी संरक्षण, दिव्यांग मुलांसाठी तळागाळात काम करणाऱ्या आठ स्वयंसेवी संस्थांचा यात समावेश होता.

‘पीच परफेक्ट’च्या या सत्रात प्रयत्न-फॉर पीपल विथ स्पेशल नीड, ज्ञानदा इन्स्टिट्यूट ऑफ फ्लो पाईपिंग टेक्नॉलॉजी, एकलव्य इंडिया फाउंडेशन, तपस्या प्रतिष्ठान, ऍग्रो रेंजर्स ट्रस्ट, समता केंद्र, अनुभूती सोशल एम्पॉवरमेंट अँड एज्युकेशनल फाउंडेशन व ब्ल्यू क्रॉस सोसायटी पुणे (प्राण्यांसाठी कार्यरत) या संस्थांसाठी हे निधी संकलन करण्यात आले. प्रसिद्ध उद्योजिका माजी खासदार अनु आगा, मेहेर पदमजी, प्रदीप भार्गवा, आर. वासुदेवन यांच्यासह उद्योग जगतातील दिग्गज मंडळी यावेळी उपस्थित होते.

Pune : अयोध्येमध्ये चांगले काम अजून होणे बाकी – श्री श्री श्री जगद्गुरू कांची कामकोटी पीठाधीश्वर शंकर विजयेंद्र सरस्वती स्वामी

एसव्हीपी पुणेच्या अध्यक्षा रचना राठी म्हणाल्या, “संस्था आणि दानशूर, परोपकारी व्यक्तींना एका व्यासपीठावर आणून त्यांच्यातील दुवा बनण्याचा हा प्रयत्न होता. हा उपक्रम आनंद देणारा ठरला. या स्वयंसेवी संस्थांना प्रशिक्षित करण्यासाठी दोन महिन्यांची घेतलेली मेहनत आज सत्कारणी लागल्याचे समाधान आहे. दोन कोटी 35 लाख रुपयांचा निधी या संस्थांसाठी आम्ही उभा करू शकलो, याचा आनंद वाटतो. समाजातील अनेक दानशूरांनी सढळ हाताने निःस्वार्थ मदत केली आहे. अपेक्षेपेक्षा खूपच चांगला प्रतिसाद मिळाला असून, ‘पीच परफेक्ट’ हा उपक्रम खरोखरच महत्वपूर्ण ठरला आहे.”

एसव्हीपी इंडियाचे प्रमुख गोविंद अय्यर म्हणाले, “एसव्हीपी ही संस्था जागतिक स्तरावर दानशूर व परोपकारी व्यक्तींना एकत्र आणणारी एकमेव संस्था आहे. एनजीओचे काम समजून घेत त्यांच्या कार्याला हातभार लावण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यास एसव्हीपी प्रोत्साहित करते. ‘पीच परफेक्ट’मधून एनजीओंचा क्षमता विकास करून त्यांच्या प्रगतीला संधी देण्याचा प्रयत्न आहे. यातून संस्थांना औद्योगिक सामाजिक बांधिलकी अंतर्गत मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होत आहे.”

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.