Chinchwad : अट्टल गुन्हेगार असिफ दाढी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला

एमपीसी न्यूज – पुण्यातील (Chinchwad) गुंड गजा मारणे याने पार्थ पवार यांची भेट घेतली. या भेटीला काही दिवसांचा कालावधी उलटताच थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला पिंपरी-चिंचवड मधील अट्टल गुन्हेगार गेल्याचा फोटो समोर आला. यामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे.

का घेतली अजित पवार यांची भेट?

असिफ दाढी (Asif Dadhi) याने अजित पवार यांच्या मुंबई येथील देवगिरी बंगल्यावर जाऊन त्यांची भेट घेतली. तो एका कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी अजित पवार यांच्याकडे गेला असल्याची माहिती मिळत आहे. असिफ दाढी हा तृतीयपंथीयांसाठी काम करणाऱ्या एका संस्थेशी जोडलेला असल्याचेही समजत आहे.

असिफ दाढीच्या गुन्हेगारीला 36 वर्षांचा इतिहास

असिफ दाढी याच्यावर सन 1988 मध्ये मारहाणीचा पहिला गुन्हा दाखल झाला. त्यानंतर लगेच मारहाणीचा आणखी एक गुन्हा दाखल झाला. सन 1996 मध्ये त्याच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला. (Chinchwad) सन 2002 मध्ये जबरी चोरीचा गुन्हा दाखल आहे. सन 2004 मध्ये खुनाच्या प्रयत्नाचा दुसरा गुन्हा दाखल झाला. सन 2007 मध्ये खुनासाठी अपहरण आणि खून असा गुन्हा दाखल आहे. सन 2009 आणि सन 2011 मध्ये शस्त्र बाळगल्या प्रकरणी दोन गुन्हे दाखल आहेत. सन 2021 साली त्याच्यावर अंगावर धावून जात जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने त्याला त्याच्या घरातून शस्त्रासह अटक केली होती.

गुंडांच्या भेटीगाठी

नुकतीच पुण्यातील गुंड गजा मारणे (Gajanan Marne) याने उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांचे पुत्र पार्थ पवार (Parth Pawar) यांची भेट घेतली. या भेटीवरून मोठे वादंग निर्माण झाले. ही भेट चुकीची असल्याचे खुद्द अजित पवार यांनी सांगितले होते. तसेच आपण याबाबत काळजी घेऊ, असेही त्यांनी आश्वस्त केले होते. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसाला कुख्यात गुंड हेमंत दाभेकर याने भेट घेतली. या भेटीला अवघे काही तास झालेले असतानाच आणखी एका नेत्याच्या भेटीला अट्टल गुन्हेगार गेल्याचा फोटो समोर आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.