Pune : स्वच्छ सर्वेक्षण नावाखाली शहरात कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी!; शिवसेना नगरसेवक विशाल धनवडे यांचा आरोप

एमपीसी न्यूज – स्वच्छ सर्वेक्षण नावाखाली पुणे शहरात कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी सुरू आहे. शहरात कंटेनर मुक्त केले. परंतु, जिथे कोपरा तिथे कचरा अशी परिस्थिती झाली आहे, असा आरोप शिवसेना नगरसेवक विशाल धनवडे यांनी मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीत केला.

सेवकांची संख्या अपुरी आहे. घंटागाडी नाहीत, छोटा हत्ती या गाड्या नाहीत, मग नागरिक कचरा टाकणार कुठे? त्यामुळे नागरिक जिथे कोपरा मिळेल, तिथे कचरा टाकू लागले आहेत, यास जबाबदार कोण आणि या परिस्थितीत कशा प्रकारे मार्ग काढणार, असे अनेक सवाल विशाल धनवडे यांनी उपस्थित केले. तर, 8 दिवसांत सर्व वाॅर्ड ऑफिसर यांना बोलावून परिस्थितीचा आढावा घेतो. घंटागाडी, छोटा हत्ती व किती सेवक आवश्यक आहे, ते पुरविण्याची व्यवस्था करतो, असे उत्तर महापालिकेच्या कचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख ज्ञानेश्वर मोळक यांनी दिले.

8 दिवसांत महापालिका कामगारांच्या खात्यात रक्कम जमा करणार
सातव्या वेतन आयोगापोटी पुणे महापालिका कर्मचाऱ्यांना २५००० उचल देण्याचे स्थायी समिती आणि मुख्य सभेने मान्य केले असताना, आजपर्यंत त्यांच्या खात्यात रक्कम का जमा झाली नाही?, असा सवाल विशाल धनवडे यांनी उपस्थित केला असता, 8 दिवसांत महापालिका कामगारांच्या खात्यात रक्कम जमा करण्याची व्यवस्था करण्यात येईल, असे पुणे महापालिकेच्या मुख्य लेखापाल उल्का कळसकर यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.