Pune Corona Alert: जून महिन्यात कोरोनाचे संकट आणखी गडद होणार; स्मार्ट सिटी अहवालात व्यक्त केली भीती

The Corona crisis will get even darker in June; Fear expressed in the Smart City report

एमपीसी न्यूज – पुणे शहरातील कोरोना काही कमी होण्याची चिन्हे नाहीत. आताच या रोगामुळे 284 नागरिकांचा मृत्यू झाला असून, साडेपाच हजारांवर रूग्णसंख्या गेली आहे. जून महिन्यात तर हे संकट आणखी गडद होणार असल्याची भीती पुणे स्मार्ट सिटीच्या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.

जून अखेरीस पुणे शहरात तब्बल 23 हजार रुग्ण होणार असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. त्यामध्ये 10 हजार ऍक्टिव्ह रूग्णसंख्या राहणार आहे. त्यादृष्टीने महापालिकेने नियोजन सुरू केले आहे.

सध्या महापालिकेकडे केवळ 7 हजार बेडस आहेत. आणखी 23 हजार बेड्सची क्षमता वाढवावी लागणार आहे. पुण्यात रूग्णसंख्या दुप्पट होण्याचा सध्याचा कालावधी 14 दिवसांचा आहे. प्रशासनातर्फे मोठ्या प्रमाणात कोरोना चाचण्या करण्यात येत आहे.

त्यामुळे नागरिकांनी आतापासूनच दक्ष राहण्याची गरज निर्माण झाली आहे. हा आजार टाळण्यासाठी नागरिकांनी जास्तीत जास्त घरीच राहण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. कोरोनावर सध्या कोणतीही लस नाही.

या आजाराला दूर ठेवण्यासाठी केवळ मास्क घालणे, सॅनिटायजरचा वापर करणे, सोशल डिस्टनसिंगचे पालन करणे, असे आवाहन वारंवार करण्यात येत आहे.

जून महिन्यात महापालिका प्रशासनावर प्रचंड ताण येणार आहे. याच महिन्यात पावसालाही सुरुवात होणार आहे. सध्या महापालिकेची यंत्रणा रात्रंदिवस राबत आहे.

महापालिकेच्या 50 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. महापालिकेच्या शासकीय रुग्णालयात कोरोना रुग्ण दाखल करण्याची क्षमता संपली आहे. खाजगी रुग्णालयावरच यापुढे भिस्त राहणार आहे. त्यासाठी महापालिकेतर्फे विविध रुग्णालयांशी करार करण्यात आले आहे.

सध्या या आजारातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. पण, ज्या रुगांना नव्याने कोरोना होणार आहे. त्यांच्यासाठी सोयीसुविधा पुरविणे महापालिकेला जड जाणार आहे. यावर्षी कोरोनाचा संकटामुळे महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.