Pune : नव्या उर्जेच्या जागरणाची, विधायक कार्याची देशाला गरज – डॉ. बाबा आढाव

एमपीसी न्यूज – “सध्या समाजाची अवस्था अतिदक्षता विभागात ठेवल्यासारखी (Pune) झाली आहे. भारत घडवण्याच्या घोषणा करणारे प्रत्यक्षात जे करत आहेत, त्यामुळे समाजाची अवस्था रुग्णाप्रमाणे झाली आहे. यातून बाहेर पाडण्यासाठी नव्या उर्जेच्या जागरणाची, सकारात्मक कार्यकर्त्यांची आज देशाला गरज आहे,” असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत आणि सामाजिक कायकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी येथे केले. विधायक संघर्षाची ऊर्जा लोकशाहीला बळ देत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

ग्रॅव्हिटस फाऊंडेशन पुणेच्या वतीने ऊर्जा पुरस्कार 2024 चे वितरण बाबा आढाव यांच्या उपस्थितीत झाले. आपटे रस्त्यावरील हॉटेल रामी ग्रँडमध्ये झालेल्या सोहळ्यात संयोजिका व ग्रॅव्हिटस फाऊंडेशनच्या अध्यक्षा उषा काकडे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रकाश आमटे, सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या प्र-कुलपती डॉ. विद्या येरवडेकर, माजी खासदार संजय काकडे, अभिनेत्री दिव्या शेठ, सल्लागार व ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

गडचिरोली येथील हेमलकसा, लोकबिरादरी प्रकल्पाच्या सहसंस्थापक, सामाजिक कार्यकर्त्या डॉ. मंदाकिनी आमटे यांना ऊर्जा जीवनगौरव पुरस्कार, तर दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे संस्थापक डॉ. मिलिंद कांबळे (उद्योग), साहित्यिका इंदुमती जोंधळे (शिक्षण), इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे (आरोग्य), जागतिक स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती बॉक्सर देविका घोरपडे (क्रीडा), आशियाई स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता दिव्यांग गोळाफेकपटू सचिन खिलारी (विशेष पुरस्कार) यांना यंदाचा ‘उर्जा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच वीरपत्नी दीपाली मोरे यांना शहीद जवान विजय मोरे यांच्या स्मरणार्थ ‘शौर्य पुरस्कार’ देण्यात आला. शाल, मानचिन्ह व रोपटे असे पुरस्काराचे स्वरुप होते.

याप्रसंगी डॉ. बाबा आढाव यांनी पुरस्कारप्राप्त मान्यवरांचे कौतुक केले. तसेच समाजाच्या कल्याणासाठी, मानवतेसाठी झटणाऱ्या आणि कार्यरत असणाऱ्या योग्य व्यक्तींची निवड करून त्यांना सन्मानित करणाऱ्या उषा काकडे यांचे विशेष अभिनंदन त्यांनी केले. तळागाळातील माणसांसाठी झटणाऱ्या, अडचणींतून मार्ग शोधणाऱ्या, मानवतेसाठी लढणाऱ्या, प्राण्यांवर प्रेम करणाऱ्या, संघर्षातून पुढे जाणाऱ्यांचा नेमका शोध घेण्याचा हा उपक्रम अनुकरणीय आहे. विधायक संघर्षांचा हा सन्मान आहे, असेही डॉ. बाबा आढाव यांनी नमूद केले.

डॉ. मंदाकिनी आमटे यांनी आपला जीवनप्रवास कथन केला. ‘गेल्या 50 वर्षांपासून आदीवासींच्या कल्याणासाठीचे कार्य अविरत सुरू आहे. बाबा आमटे यांच्या प्रेरणेने सुरू झालेले कार्य आम्ही पुढे नेले आणि आता पुढची पिढीदेखील याच कार्याचा वसा (Pune) घेऊन काम करते आहे. सुरवातीला घनदाट जंगलातील आदीवासी आमच्याकडे संशयाने बघत, आमच्यापासून पळून जात, तेच लोक आता स्वतःहून उपचारासाठी येतात, इतरांना घेऊन येतात, मुलांना शिकण्यासाठी पाठवतात. हा बदल सुखावणारा आहे. अर्थात हे काम सर्व कार्यकर्त्यांच्या पाठबळावर उभे राहिले आहे. पुरस्कार, सन्मान नेहमीच पाठबळ देणारे आणि उर्जा देणारे असतात. या सन्मानाच्या नावातच उर्जा असल्याने त्याचे वेगळेपण अधिक आहे’, असे त्या म्हणाल्या. ‘मंदाकिनीने मला आयुष्यभर सर्वार्थाने साथ दिली आहे, तिचा सन्मान हा माझाही गौरव असल्याची भावना डॉ. प्रकाश आमटे यांनी व्यक्त केली.

डॉ. विद्या येरवडेकर यांनी ग्रॅव्हिटस फाऊंडेशनच्या उषा काकडे यांच्या कर्तृत्वाचा प्रवास उलगडला. सामाजिक कार्यात उषाताई सदैव अग्रेसर असल्याचे त्यांनी सांगितले. संजय काकडे म्हणाले, ‘समाजाच्या तळागाळातील व्यक्तींसाठी काम करणाऱ्या, देशासाठी अभिमानाची कामगिरी करणाऱ्यांना सन्मानित करण्याचा उपक्रम उषा काकडे यांनी सुरू केला, याचा मला अभिमान वाटतो’.

डॉ. मिलिंद कांबळे यांनी आपला जीवनप्रवास उलगडत दलित समाजातून बिझनेस लीडरशिप पुढे यावी, यासाठी प्रयत्नरत असल्याचा उल्लेख केला. ‘दलित तरुणांसमोर अभियांत्रिकी, वैद्यकीय, कायदा, नोकरी यांच्या जोडीने उद्योजकतेचा मार्गही असावा. शिक्षण, नोकरी आणि राजकारण यासोबत त्यांनी उद्योजकीय मानसिकता विकसित करावी’, असा उद्देश असल्याचे ते म्हणाले.

Pimpri : पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र पोस्ट मुख्यालयाची मागणी

इंदुमती जोंधळे म्हणाल्या, ‘मी अनाथालयात वाढले. संघर्ष सुरवातीपासून वाट्याला आला. सर्व प्रतिकूलता सोसत वाटचाल करताना आयुष्याचे चिंध्यांचे गाठोडे तयार झाले, त्या गाठोड्याची सर्वांच्या सहकार्याने उबदार गोधडी बनली आहे. लेखनासाठी, संघर्षासाठी ही ऊबच प्रेरणा देते’.

डॉ. अविनाश भोंडवे यांनी आपल्या वैद्यकीय क्षेत्रातील कार्याचा परिचय देतानाच, कोविड काळात इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष या नात्याने समाजासाठी केलेल्या विशेष उपक्रमांची माहिती दिली. देविका घोरपडे यांनी खेळासाठी कुटुंबातून प्रोत्साहन मिळाल्याचे सांगितले.

सचिन खिलारे यांनी एक हात जायबंदी झाल्यावर क्रीडाप्रकार कसा बदलावा लागला, याची कहाणी श्रोत्यांसमोर ठेवली. ‘परिश्रमांतील सातत्य, तंत्रावरील हुकमत, आत्मविश्वास आणि देशासाठी कार्य करण्याची प्रबळ इच्छा, यामुळे जागतिक स्पर्धेमध्ये सुवर्णपदकांची कमाई करता आल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला.

वीरपत्नी दीपाली विजय मोरे यांच्या वतीने त्यांचे सुपुत्र विश्वजीत यांनी सन्मान स्वीकारला. दीपाली मोरे यांचे आप्त दत्तात्रेय मोरे यांनी दीपाली यांच्या संघर्षाची कहाणी सांगितली. विश्वजीत मोरे यांनीही मनोगत मांडले. लीना सलढाना-जोशी यांनी सूत्रसंचालन केले. स्वागत-प्रास्ताविक उषा काकडे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.