Pune : वाईनशॉप उघडलेच नाही, मद्यप्रेमींची घोर निराशा ; सकाळी 7 पासून लावल्या होत्या रांगा

एमपीसी न्यूज – पुण्यात सोमवारी मध्यप्रेमींची घोर निराशा झाली. दारू मिळणार असल्याच्या बातमीने सकाळी 7 पासून दुकानांसमोर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. जवळपास अर्धा किलोमीटर पर्यंत या रांगा लागलेल्या होत्या. मात्र, दुकाने उगडलीच नाही त्यामुळे तळीरामांची घोर निराशा झाली.

मागील सव्वा महिन्यापासून पुणे शहरातील वाईन शॉप बंद आहेत. आज दारूची विक्री होणार असल्याने पुण्यातील तळीरामांनी सकाळी ७ वाजल्यापासून वाईनच्या दुकानाबाहेर रांगा लावल्या होत्या. मात्र, याबाबत पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कोणतेही आदेश दिलेले नाहीत. आदेश मिळेपर्यंत वाईन शॉप सुरु करता येणार नाहीत, असे वाईनशॉप मालकांनी जाहीर केले. त्यामुळे मद्यप्रेमींना दारू मिळाली नाही.

वारजे – कर्वेनगर, सिंहगड रोड, बाणेर – बालेवाडी परिसरात दारू विक्री होणार असल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. लांबच लांब रांगा लागत असल्याने पोलिसांनी सौम्य लाठीमार करीत ही गर्दी पांगवली. मद्यविक्रीची परवानगी देण्याचे अंतिम अधिकार हे जिल्हाधिकाऱ्यांचे आहेत. त्यांनी परवानगी दिली तरच वाईन शॉप सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान वाईन शॉप समोर मद्यप्रेमींनी हातात पिशव्या घेऊन मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. आज दारू मिळणार असल्याने अनेकांनी आनंद व्यक्त केला. मात्र, 2 ते 3 तास रांगेत उभे राहूनही दुकाने काही उघडलीच नाही. त्यामुळे मद्यप्रेमींचा घसा कोरडाच राहिला.

वारंवार आवाहन करूनही गर्दी कमी होत नसल्याने पोलिसांनी हातात काठी घेऊन ही गर्दी पांगवली. त्यामुळे दारू घेण्याऐवजी पोलिसांच्या काठीचा प्रसाद खाण्याची वेळ आली. दरम्यान, लवकरच वाईन शॉप सुरू होणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.