Pune : थायरोकेअर प्रयोगशाळेची ‘कोवीड-19’ स्वॅब तपासणी बंद : जिल्हाधिकाऱ्यांची धडक कारवाई

Thyrocare Laboratory's 'Kovid-19' swab closed: District Collector :आयसीएमआर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांच्या यादीमध्ये थायरोकेअर प्रयोगशाळेचा समावेश

एमपीसी न्यूज – हवेली तालुक्यातील ग्रामीण कार्यक्षेत्रामधील थायरोकेअर प्रयोगशाळेचे कामकाज कोरोना विषाणू तपासणीच्या अनुषंगाने संशयास्पद आढळले. त्यामुळे ही प्रयोगशाळा कोवीड-19च्या कोरोना स्वॅब तपासणीकरीता बंद करण्याची धडक कारवाई जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केली आहे.

उपविभागीय अधिकारी हवेली यांच्याकडील अहवालानुसार कोरोना आजाराच्या संशयित रुग्णांची तपासणी करणा-या आयसीएमआर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांच्या यादीमध्ये थायरोकेअर प्रयोगशाळेचा समावेश आहे.

या प्रयोगशाळेमध्ये मौजे खानापुर (ता.हवेली) येथील धुमाळ कुटूंबातील व्यक्तींनी कोरोना विषाणूची तपासणी केली असता दोन व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह व एका लहान मुलाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता.

या अहवालाच्या निष्कर्षावर कुटूंबाने संशय व्यक्त केल्याने त्यांचे अहवाल पुन्हा एनआयव्ही पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले. तेथे सर्व धुमाळ कुटूंबाचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

त्यामुळे स्थानिक जनतेने व गावातील इतर रुग्णांनी थायरोकेअर या प्रयोगशाळेच्या कामकाज व निष्कर्षाबाबत संशय व्यक्त केला. त्यामुळे ही कारवाई केल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.