Pune : शहरातील रुग्णांवर विनाविलंब उपचार करा : महापालिका आयुक्त

Treat patients in the city immediately: Municipal Commissioner

सर्व खाजगी रुग्णालये, नर्सिंग होमला पत्र

एमपीसी न्यूज – संपूर्ण भारतात कोरोना विषाणूची साथ झपाट्याने पसरत आहे. त्यातही महाराष्ट्रात व विशेषतः पुणे शहरात या साथीच्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे आपल्या रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांवर विनाविलंब उपचार करा, औषधोपचाराभावी रुग्णाचा मृत्यू अथवा दिरंगाई होणार नाही, याबाबत काळजी घ्यावी, असे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी पुण्यातील सर्व खाजगी रुग्णालये आणि नर्सिंग होमला बजावले आहे.

शासनाने आदेश दिल्याप्रमाणे साथरोग नियंत्रण अधिनियम 1897 ची शहरात अंमलबजावणी करण्यात येत आहे. सामान्य आजारी व्यक्तींना, नागरिकांना उपचार मिळविताना अडचणी निर्माण होत आहेत.

महापालिका प्रशासनातर्फे आवाहन करूनही आजही कोविड – 19 व्यतिरिक्त अन्य आजाराने त्रस्त व अपघातग्रस्त रुग्णांना वेळीच उपचार मिळत नाही.

त्यामुळे रुग्णांना अन्य ठिकाणच्या हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यास सांगितले जाते. अशा तक्रारी महापालिकेकडे करण्यात आल्या आहेत. याबाबत नगरसेवक, विविध पक्ष संघटनांचे पदाधिकाऱ्यांनाही नाराजी व्यक्त केली आहे. ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची आहे.

राज्यातील नॉन कोविड रुग्णांसाठी शासकीय आणि खाजगी रुग्णालयांमधून आवश्यक त्या उपचारात्मक सुविधा उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. मात्र, नॉन कोविड – 19 इतर आजारी व्यक्तींना, नागरिकांना उपचार मिळवण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत.

पुणे महापालिका कार्यक्षेत्रात येत असलेल्या सर्व खाजगी रुग्णालये, दवाखाने यांनी आपल्या सेवा नियमितपणे द्याव्यात, कोणत्याही सबळ कारणाशिवाय ही सेवा संबधितांनी रुग्णास उपलब्ध करून न दिल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा आयुक्तांनी पुण्यातील सर्व खाजगी रुग्णालये आणि नर्सिंग होमला पाठविलेल्या पत्रात दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.