Pune : वीस हजाराची लाच स्वीकारताना दोन पोलीस कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज- ससून रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या आरोपी मुलाशी भेट घडवून देण्यासाठी आरोपीच्या वडिलांकडून २० हजारांची लाच स्वीकारताना दोन पोलीस कर्मचाऱ्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी ही कारवाई केली.

स्वप्नील भीमराव भद्रे (वय 30, रा. A/5, रूम न 12, विश्रांतवाडी पोलीस लाईन पुणे व अनोश ऑगस्टिन गायकवाड (वय 24 रा. कनक अपार्टमेंट, फ्लॅट न 12, दौंड) अशी या प्रकरणी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी एका ५८ वर्षाच्या इसमाने तक्रार दाखल केली आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदारांच्या मुलगा शुकराज हा येरवडा कारागृहात बंद असताना त्याने त्याच्यावर केलेल्या कारवाई विरुद्ध जेलमध्ये उपोषण सुरू केले होते. त्यामध्ये त्याची प्रकृती बिघडल्याने त्यास ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. भद्रे आणि गायकवाड यांची ससून रुग्णालयात शुकराज याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी नेमणूक करण्यात आली होती.

आपल्या मुलाची भेट घडवून आणण्यासाठी तक्रारदारांनी विनंती केली असता आरोपी भद्रे याने तक्रारदाराकडे २० हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारली. आरोपी गायकवाड याने त्याला मदत केल्याच्या आरोपावरून दोघांना ताब्यात घेण्यात आले.

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग युनिट एकचे सहायक पोलीस आयुक्त दत्तात्रय वि भापकर, श्रीमती प्रतिभा शेंडगे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.