Pune : कारच्या धडकेमध्ये दुचाकीवरील दोन तरुणांचा मृत्यू

एमपीसी न्यूज- ख्रिसमसची पार्टी करून दुचाकीवरून ट्रीपल सीट निघालेल्या तीन जणांना विरुद्ध बाजूने आलेल्या कारने धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला तर तरुणी गंभीर जखमी झाली. हा अपघात काल बुधवारी (दि.26) रात्री पाऊणच्या सुमारास वडगाव शेरी येथील अरनॉल्ड शाळेशेजारी आदर्शनगर येथे झाला.

अमेय रविशेखर आखारे (वय 25, रा.वाघोली), ऐरीक जोसेफ रॉड्रिक्स ( वय 25 रा.वडगाव शेरी) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत.
या प्रकरणी शायनस कावन (वय 21 रा.तळेगाव दाभाडे, पुणे) ही तरुणी गंभीर जखमी झाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ख्रिसमस निमित्त मंगळवारी अमेय आणि शायनस या दोघांनी वडगाव शेरीत राहणारा त्यांचा मित्र एरिक राँड्रिक्सच्या घरी पार्टी करण्याचे ठरवले होते. एरिकच्या घरी ख्रिसमसची पार्टी साजरी करून रात्री पावणे एकच्या सुमारास अमेय व एरिक शायनसला दापोडीतील तिच्या घरी सोडण्यासाठी एकाच दुचाकीवरून तिघेजण निघाले. ऐरीक गाडी चालवत होता तर अमेय आणि शायनस हे त्याच्या मागे बसले होते.

वडगाव शेरी येथे मध्यरात्री पाऊण वाजता अर्नॉल्ड शाळेजवळ अचानक समोरून आलेल्या एका लाल रंगाच्या कारने त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील तिघेजण गाडीवरून फेकले गेले. यामध्ये अमेय व एरिक जागीच मृत्युमुखी पडले तर शायनस गंभीर जखमी झाली. याप्रकरणी अज्ञात कारचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास येरवडा पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.