Pune : अर्थव्यवस्थेच्या सक्षमीकरणात सनदी लेखापालांचे मोलाचे योगदान

एमपीसी न्यूज – “सनदी लेखापाल ज्ञान आणि सत्य याचा संगम आहे. भारतीय अर्थव्यवस्थेला (Pune)सक्षम बनवण्यात आपण मोलाचे योगदान देत आहात. युवाशक्तीचा सदुपयोग, शहरीकरणाचा विस्तार, अक्षय ऊर्जेचा वाढता वापर, डिजिटल अर्थव्यवस्थेला चालना आणि चांगल्या पायाभूत सुविधांची उभारणी यातून भारतीय अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलरचे उद्दिष्ट्य गाठेल,” असे प्रतिपादन गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्सचे कुलगुरू डॉ. अजित रानडे यांनी केले.

दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) बोर्ड ऑफ स्टडीज ऑपरेशन्स, आयसीएआय पुणे शाखा आणि ‘विकासा’ पुणे शाखेच्या वतीने आयोजित ‘ज्ञानगम्य : सीए विद्यार्थ्यांसाठी दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद’चे उद्घाटन डॉ. अजित रानडे यांच्या हस्ते झाले. या परिषदेत देशभरातून जवळपास 2000 सीए विद्यार्थी सहभागी झाले होते.

वर्धमान सांस्कृतिक केंद्रात झालेल्या (Pune)सोहळ्यात ‘आयसीएआय’चे केंद्रीय समिती सदस्य सीए चंद्रशेखर चितळे, सीए मंगेश किनरे, सीए दयानिवास शर्मा, विभागीय समिती सदस्य सीए यशवंत कासार, सीए ऋता चितळे, आयसीएआय पुणेचे अध्यक्ष सीए राजेश अग्रवाल, उपाध्यक्षा सीए अमृता कुलकर्णी, ‘विकासा’ पुणेचे अध्यक्ष सीए सचिन मिणियार, उपाध्यक्ष साईराम खोंड, कार्यकारिणी सदस्य सीए प्रणव आपटे, सीए काशिनाथ पठारे, सीए प्रितेश मुनोत, ‘विकासा’ पुणेचे सचिव माधविक शहा, खजिनदार समीक्षा सिरसाठ, सहसचिव ओंकार फाफळ, सहखजिनदार सुहास सावंत, संपादकीय प्रमुख स्नेहा वेदपाठक आदी उपस्थित होते.

डॉ. अजित रानडे म्हणाले, “सनदी लेखापाल हा अर्थव्यवस्थेचा महत्वाचा दुवा आहे. उद्योगांसह अन्य आर्थिक व्यवहारांना शिस्त लावण्याचे काम आपण करत असतो. सध्याचे युग हे ज्ञान अर्थव्यवस्थेचे (नॉलेज इकॉनॉमी) आहे. भारतीय उत्पादन व सेवा निर्यातीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.

विकासाच्या मार्गावर झपाट्याने चाललेल्या भारतीय अर्थव्यवस्थेला ज्ञानक्रांतीमुळे चालना मिळेल. तंत्रज्ञानयुक्त या नव्या युगात सीए होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी उपलब्ध संधींचा लाभ घेत अर्थव्यवस्थेचे आधारस्तंभ बनावे. प्रामाणिकपणा व सखोल ज्ञानाच्या आधारे हा व्यवसाय वृद्धिंगत करावा.”

सीए चंद्रशेखर चितळे म्हणाले, “सनदी लेखापाल बनू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्वांगीण ज्ञान देण्यासाठी सीए इन्स्टिट्यूट नेहमीच अग्रेसर आहे. पाठ्यक्रमासह अवांतर उपक्रमातून सीए करणारा विद्यार्थी सर्वार्थाने घडतो. सीए देशाच्या अर्थव्यवस्थेला आकार देणारे शिल्पकार आहेत.”

सीए मंगेश किनरे म्हणाले, “सीए अभ्यासक्रम डिस्टन्स लर्निंग नसून, तो रोजच्या अनुभवातून शिकण्याचा आहे. अधिकाधिक ज्ञान, बदलते तंत्रज्ञान आत्मसात करा. पुणे शाखेच्या वतीने राष्ट्रीय परिषदांचे उत्तम आयोजन होत आहे. देशभरातील दोन हजार पेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी झाले आहेत.”

Alandi : भागवत एकादशी निमित्त माऊली मंदिरात आकर्षक फुलसजावट

सीए दयानिवास शर्मा म्हणाले, “कोणत्याही क्षेत्रात काम करताना यशस्वितेचा आत्मविश्वास बाळगला पाहिजे. विपुल ज्ञानग्रहण करून उत्तीर्ण होण्याला महत्व आहे. यशस्वी झाल्यानंतर अपयशाला कोणी विचारत नाही. परंतु, अपयशातून चुका सुधारत यशाकडे वाटचाल करणे महत्वाचे असते.”

सीए ऋता चितळे यांनी पुनर्वापर व प्रदूषण कमी करण्याविषयी मार्गदर्शन केले. उपलब्ध संसाधनांचा वापर जपून करण्यासह पाणी व अन्य गोष्टींसाठी प्लास्टिकचा वापर टाळायला हवा, असे आवाहन केले. शाश्वत मानकांचा अवलंब करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

सीए यशवंत कासार म्हणाले, “तंत्रज्ञान झपाट्याने बदलत आहे. त्याचा अंतर्भाव सीए व्यवसायात होत आहे. त्यामुळे सीए करणाऱ्या विद्यार्थ्यांनी हे नवे बदल, तंत्रज्ञान आत्मसात करावे. सतत नवीन गोष्टी शिकत राहाव्यात. शिकण्यात प्रामाणिकपणा जपावा.”

सीए राजेश अग्रवाल म्हणाले, “यशासाठी सातत्य, चिकाटी, कष्ट करण्याची तयारी आणि त्याला स्वयंप्रेरणेची जोड हवी. आयसीएआय भवनमध्ये सीए सभासद व विद्यार्थ्यांकरिता कार्यशाळा, चर्चासत्रे, परिषदा सातत्याने आयोजित करण्यात येतात.”

सीए सचिन मिणियार यांनी स्वागत केले. सांची होनराव व अभिषेक पुराणिक यांनी सूत्रसंचालन केले. सीए अमृता कुलकर्णी यांनी आभार मानले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.