Pune : कोरोनाच्या लढाईत मदतकार्य मोलाचे – महापौर 

प्राप्त परिस्थितीत सर्वाधिक मदतीची गरज ही वैद्यकीय सेवा पुरविणाऱ्या घटकास आहे.

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या लढाईत सामान्य नागरिकांकडून केल्या जाणाऱ्या मदतीचा आधार वाटतो आणि लढण्यासाठी उर्जा मिळते, असे भावूक उद्गार महापौर मुरलीधर मोहोळ यांनी काढले. सद्यस्थितीत केली जाणारी मदत अत्यंत मौल्यवान असून त्यातूनच माणुसकीचे दर्शन घडते असेही ते म्हणाले.

प्रभाग क्रमांक 13 मधील महाराष्ट्र पीडब्ल्युडीए को. ऑ. हौसिंग सोसायटी (भरतकुंज सोसायटी) च्यावतीने नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांच्या माध्यमातून रुग्ण तपासणीसाठी पुणे मनपाला 75 पल्स ऑक्सीमीटरची भेट देण्यात आली. त्यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ भावनिक झाले. या संकट काळात पुणेकर विविध माध्यमातून करत असलेल्या मदतीचा त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला.

आम्ही सामाजिक बांधीलकीच्या जाणीवेतून ही मदत करत असून सद्यस्थितीत प्रशासनास सर्वतोपरी सहकार्य करावे. कोरोना योद्धांवरील भार कमी करावा, या हेतूने ही मदत करत असल्याचे भरतकुंज सोसायटीचे अध्यक्ष ॲड. एम. एस. रानडे म्हणाले.

प्राप्त परिस्थितीत सर्वाधिक मदतीची गरज ही वैद्यकीय सेवा पुरविणाऱ्या घटकास आहे. त्यातही अत्यवस्थ रुग्णांची ऑक्सीजन लेव्हलची चाचणी महत्त्वाची आहे. आम्ही मनपाला पल्स ऑक्सीमीटर भेट देण्याचा निर्णय घेतला, असे डॉ. संजीव खुर्द यांनी सांगितले. यावेळी भाजपचे शहर उपाध्यक्ष संदीप खर्डेकर, भरतकुंज सोसायटीचे सचिव दिलीप थत्ते, कोषाध्यक्ष दिलीप भट उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.