Pune : राजकीय नेत्यांऐवजी रंगकर्मींच्या नावाने थिएटर का नाही – नसीरुद्दीन शाह

एमपीसी न्यूज – ज्यांनी रंगभूमीवर हयात वेचली, अशा रंगकर्मींच्या (Pune) नावाने अगदी तुरळक नाट्यगृहे दिसतात. पण राजकीय नेत्यांच्या नावाने मात्र अनेक नाट्यगृहे आहेत, असे का? असा प्रश्न ज्येष्ठ रंगकर्मी आणि अभिनेते नसिरुद्दीन शाह यांनी केला.

महाराष्ट्र कल्चरल सेंटर आणि लागू परिवार यांच्या वतीने उभारण्यात आलेल्या पुण्यातील श्रीराम लागू रंग – अवकाश या प्रकल्पाचे औपचारिक उद्घाटन आज ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांच्या हस्ते संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते. टिळक रस्त्यावरील हिराबाग चौक येथील ज्योत्स्ना भोळे सभागृह इमारतीच्या पहिला मजल्यावर हा प्रकल्प उभारण्यात आला आहे.

Smart City : सायकलिंगच्या पायाभूत सुविधांबाबत देशभरातील सायकल मेअरचे पिंपरी-चिंचवडमध्ये मंथन

डॉ श्रीराम लागू यांच्या पत्नी दीपा लागू, मुलगा डॉ आनंद लागू, महाराष्ट्र कल्चरल सेंटरचे अध्यक्ष डॉ मोहन आगाशे, कार्याध्यक्ष एस पी कुलकर्णी, सुप्रसिद्ध अभिनेत्री रत्ना पाठक शाह आदी मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. सेंटरचे सचिव राजेश देशमुख, खजिनदार शुभांगी दामले, सभासद व अनेक कलाकार मंडळी देखील याप्रसंगी उपस्थित होती.

यावेळी बोलताना नसीरुद्दीन शाह म्हणाले, “राजकीय नेत्यांच्या नावे नाट्यगृहे, हे केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील चित्र आहे. गिरीश कर्नाड, शंभू मित्रा, तन्वीर हबीब, पं. सत्यदेव दुबे कुणाच्याही नावाने थिएटर नाही, ही वस्तुस्थिती एक रंगकर्मी म्हणून मला खटकते. रंगभूमीच्या जन्मस्थानी महाराष्ट्रात फक्त बालगंधर्व आणि डॉ. घाणेकर यांचे अपवाद वगळता रंगकर्मींच्या स्मृतींचे थिएटर नाही.”

पुण्यात मात्र आज डॉ. लागू यांच्या नावाने हा नवा रंग अवकाश सुरू झाला आहे, त्याचे उद्घाटन करण्याची संधी मला मिळाली, याने मी सन्मानित झालो आहे. हा नवा रंग – अवकाश म्हणजे रंगकर्मींचे दुसरे घर होवो, असेही ते म्हणाले.

“डॉ. ‌लागू यांचे काम राष्ट्रीय नाट्य विद्यालयात शिकत असताना प्रथम पाहिले.‌ 1971 चा तो काळ होता. ‘आधेअधुरे’ या नाटकातील त्यांचे काम पाहून माझा श्वास थांबला की काय, असे वाटत होते. आवाजाचा लवचिक वापर, डोळ्यातले भाव, सहजता, भावनांवर कमालीचे नियंत्रण… सर्वच विलक्षण होते.

मी त्यांची ‘गिधाडे’, ‘कस्तुरीमृग’, ‘सूर्य पाहिलेला माणूस’ ही नाटके तसेच ‘सामना’ हा चित्रपट पाहिला. मी असे काम कधी करू शकेन का, असा प्रश्न स्वतःला विचारला आणि ‘नाही’ असे उत्तर मिळाले. पण नकळत एकलव्याप्रमाणे मी त्यांच्याकडून खूप शिकत राहिलो, असेही नसीरुद्दीन शाह (Pune) म्हणाले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.