Purnanagar News : पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावले ‘चिमुकले हात’, खाऊच्या पैशातून दिले जीवनावश्यक साहित्याचे किट

एमपीसीन्यूज : कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी समाजच्या सर्व स्तरातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. यात आता चिमुकलेही पुढाकार घेऊ लागले आहेत. चिंचवडच्या पूर्णानगर येथील एका चिमुकलीने मला खाऊ नको म्हणत कोकणच्या पूरग्रस्तांना किट देण्याचा आग्रह धरला. त्यामुळे तिच्या पालकांनी जीवनावश्यक साहित्याचे पाच किट पूरग्रस्तांसाठी दिले आहेत.

परिणीता गर्ग, असे या दानशूर चिमुकलीचे नाव आहे. तिचे वय अवघे दोन वर्ष आहे. पूर्णानगर येथील एका सेवाभावी संस्थेच्यावतीने  पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत परिसरातील नागरिकांकडून जमेल ती मदत वस्तू आणि रोख स्वरूपात समितीच्या पदाधिकाऱ्यांकडे जमा केली जात आहे.

सामाजिक कार्यकर्ते विकास गर्ग यांच्या वतीनेही रोख अकरा हजार रुपये आणि महिला आणि पुरुषांचे कपडे पूरग्रस्तांसाठी जमा करण्यात आले. हे साहित्य देत असताना त्यांची मोठी मुलगी परिणीता हिने मला खाऊ नको , माझा खाऊ पण त्यांना देऊन टाका, असे म्हणत स्वतःजवळील खाऊचे पैसे मदतीसाठी देऊ केले.

दरम्यान, लाडक्या लेकीची इच्छा पूर्ण करीत गर्ग यांनी तिच्यावतीने विविध २० जीवनावश्यक साहित्याचे एकूण दहा कीट तयार केले. मोठी मुलगी परिणिता आणि छोटी मुलगी समीक्षा या दोघींच्यावतीने हे किट पूरग्रस्तांसाठी  संस्थेकडे  जमा केले.

वडिलांकडून मिळाले दातृत्वाचे बाळकडू

सामाजिक कार्यकर्ते विकास गर्ग यांच्यावतीने कोरोना महामारी, लॉकडाऊन अशा संकटात परिसरातील नागरिकांना सर्व प्रकारची मदत मिळवून देण्याचे कार्य केले आहे. तसेच परिसरातील नागरिकांचा अडीअडचणी सोडविण्यासाठी ते कायम तत्पर असतात. त्यांच्या छोट्या मुलीच्या जन्माचे स्वागत म्हणून त्यांनी विविध 29  सामाजिक उपक्रम राबवून केले होते. अशा दातृत्वाचे बाळकडू वडिलांकडून या मुलींना मिळाल्याचे गौरवोद्गार पूर्णानगर परिसरातील नागरिकांकडून काढण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.