Purnanagar News: मंगलाताई, तुम्हाला खुले निमंत्रण, उद्यान पहायला या – एकनाथ पवार

एमपीसी न्यूज – पूर्णानगर येथील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी उद्यानाचे काम अतिशय उच्च दर्जाचे झाले आहे. काम पूर्ण देखील झाले. उद्यान पाहून परिसरातील नागरिकांच्या डोळ्याचे पारणे फिटणार आहे. त्यामुळे बाहेरुन आरोप करण्यापेक्षा राष्ट्रवादीच्या नगरसेविका मंगला कदम यांनी उद्यान पाहण्यासाठी यावे. त्यांना माझे खुले निमंत्रण असल्याचे माजी सत्तारुढ पक्षनेते व भाजपचे नगरसेवक एकनाथ पवार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले. पाहणीनंतर कामाचा दर्जा, काम पूर्ण झालेले त्यांच्या लक्षात येईल. अर्धवट माहितीच्या आधारे बोलणे तुमच्या सारख्या ज्येष्ठ नगरसेविकेला शोभत नाही, असेही पवार म्हणाले.

नगरसेवक एकनाथ पवार यांच्या पुढाकाराने महापालिकेच्या वतीने पूर्णानगर येथील खाणीत  जागतिक दर्जाचे उद्यान विकसित केले आहे. भव्य आकर्षक प्रवेशद्वार, लॅन्डस्केअप गार्डन, वॉकिंग ट्रॅक, कॅन्टीनची सुविधा, सौंदर्यांचा अनुभवासाठी धबधबा, नेत्रदिपक विद्युत रोषणाई, बांबुंचे खांब अशी विविध वैशिष्ट्ये असलेल्या  भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी उद्यानाचे उद्या (रविवारी) माजी मुख्यमंत्री, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांच्याहस्ते उद्घाटन होणार आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीच्या नगरसेविका मंगला कदम यांनी उद्यानाचे काम अर्धवट असून निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना भाजप नगरसेवक एकनाथ पवार म्हणाले, ”पाठपुरावा करुन महापालिकेकडून उद्यानाचे काम मंजूर करुन घेतले. रात्रीचा दिवस करुन काम पूर्ण केले. काम करताना अतिशय दर्जात्मक काम केले आहे. उद्यानाचे काम अतिशय उच्चदर्जाचे झाले आहे. त्यामुळे मंगलाताईंनी कामाच्या दर्जाबाबत बाहेरुन बोलण्यापेक्षा उद्यानामध्ये यावे. कामाचा दर्जा बघावा, कोणते काम अर्धवट आहे हे त्यांनी सांगितले असते. तर, बरे झाले असते. पण, अर्धवट माहितीच्या आधारे बोलणे महापौर राहिलेल्या तुमच्या सारख्या ज्येष्ठ नगरसेविकेला शोभत नाही. तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. तुम्ही उद्यान पाहणी करायला या, तुमचे स्वागत आहे. तुमच्या सुचना करा, त्याचाही अंतर्भाव केला जाईल. पण, विनाकारण विकास कामात राजकारण करणे योग्य नाही”.

”या भागात मागील अनेक वर्ष तुमच्याच पक्षाचा नगरसेवक होता. पण, एकालाही खान विकसित करण्याचे सुचले नाही. आम्ही मागील पाच वर्षात या भागाचा झपाट्याने विकास केला. विकासाची गंगा कोणी आणली हे जनता जाणून आहे. त्यामुळे राजकारण न करता तुम्ही उद्यान पाहण्यास यावे. उद्घाटनालाही यावे. तुमचे स्वागत असल्याचेही” नगरसेवक एकनाथ पवार म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.