Dehu News : माहिती तंत्रज्ञानामुळे शैक्षणिक क्षेत्रामध्ये अमूलाग्र बदल: रणजीतसिंह डिसले 

एमपीसी न्यूज : बदलत्या काळानुसार सहाय्यकाची जागा तंत्रज्ञानाने घेतली असून तंत्रज्ञानाच्या मदतीने माहितीचा प्रचंड साठा उपलब्ध झाला आहे. आज पारंपारिक शिक्षण व्यवस्था ठप्प असताना देखील माहिती तंत्रज्ञानाच्या वापरामुळे ऑनलाइन शिक्षण चालू राहत शिक्षण व्यवस्थेमध्ये अमूलाग्र बदल झाला आहे, असे प्रतिपादन ग्लोबल टीचर अवॉर्ड विजेते रणजीत सिंह डिसले (गुरुजी) यांनी केले.

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वतीने आयोजित अनंत व्याख्यानमालेमध्ये ‘माहिती व तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण पद्धती’ या विषयावर पहिले पुष्प गुंफताना ते बोलत होते. यावेळी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव अॅड. संदीप कदम, खजिनदार अॅड. मोहनराव देशमुख, उपसचिव लक्ष्मणराव पवार, सहसचिव आत्माराम जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

व्याख्यानमालेचे प्रास्ताविक अॅड. संदीप कदम यांनी व्याख्यानमालेचे उद्देश स्पष्ट करताना विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणे, त्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावणे, नवीन तंत्रज्ञानाची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी व तज्ञांच्या विचारांचे मार्गदर्शन व्हावे, या उद्देशाने अनंत व्याख्यानमाला आयोजित केल्याचे सांगितले.

विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवत त्यांच्या विकासाबरोबरच शिक्षकांनी स्वतःला अद्ययावत करत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी बोलताना रणजितसिंह डिसले यांनी तंत्रज्ञान शिक्षकाची जागा घेऊ शकत नाही मात्र जे तंत्रज्ञान वापरणार नाहीत त्यांची जागा तंत्रज्ञान वापरणारे घेऊ शकतात, याकडे लक्ष वेधले. तसेच तंत्रज्ञान वापरताना शिक्षकांनी मुलांची शिकण्याची क्षमता लक्षात घेवुन तंत्रज्ञानाचा वापर करायला पाहिजे.

काळानुरूप शिक्षण क्षेत्रामध्ये झालेले बदल स्वीकारणे अपरिहार्य असल्याचे सांगितले. 21 व्या शतकातील शिक्षण पद्धतीवर भर देताना सर्जनशीलता, संवाद कौशल्य, सहकार्य, गंभीर विचारशक्ती या घटकांवर सविस्तर माहिती देत व्यवसायाची गरज ओळखून प्रत्येक विद्यार्थ्याने ज्ञान आत्मसात करणे गरजेचे असल्याचे सांगितले.

या व्याख्यानाचे सूत्रसंचालन डॉ. शिल्पागौरी गणपुळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सहसचिव आत्माराम जाधव यांनी केले.

या  व्याख्यानमालेचे संयोजन यशस्वी करण्यासाठी प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे, प्राचार्य डॉ. अशोक भोसले, प्राचार्या डॉ. रागिणी पाटील, प्राचार्य डॉ. बाळकृष्ण झावरे, प्राचार्य डॉ. पंडित शेळके, प्राचार्या डॉ. सुषमा भोसले, प्राचार्या डॅा. शर्मीला चौधरी, प्राचार्य डॉ. अभय खंडागळे, प्राचार्य डॉ. तुषार शितोळे, प्राचार्य डॉ. व्ही.एम.शिंदे तसेच सिताराम अभंग, किरण देशपांडे, संतोष पठारे यांनी परिश्रम घेतले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.