Dehu: माघ शुद्ध दशमी व शिवजयंती एकाच दिवशी आल्याने श्री क्षेत्र भंडारा डोंगरावर भाविकांची अलोट गर्दी

माघ शुद्ध दशमी या तिथीला वारकरी संप्रयदात फार मोठे महत्व (Dehu)आहे. याच तिथीला जगदगुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांना साक्षात्कार झाला व प्रापंचिक तुकाराम महाराजांचे परमार्थिक तुकाराम महाराजांमध्ये परिवर्तन झाले.

 

श्री क्षेत्र भंडारा डोंगर ही जगदगुरु तुकोबारायांची तपोभूमी, साधनाभूमी, (Dehu)चिंतनभूमी. अखिल विश्वासाठी भक्तीचे महामेरू असणारे जगदगुरु संत तुकाराम महाराजांचा साक्षात्कार दिन म्हणजे माघ शुद्ध दशमी व शक्तीचे प्रतिक असणारे महाराष्ट्राचे आराध्य दैवत, जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती एकाच दिवशी आल्याने आज सकाळपासूनच श्री क्षेत्र भंडारा डोंगरावर अबालवृद्धांसह भाविकांनी तुकोबारायांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.

शनिवार, रविवार व सोमवारी शिवजयंतीची सुट्टी असे सलग तीन दिवस भंडारा डोंगरवर महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून येत भाविक दर्शन व अन्नदानाचा, महाप्रसादाचा लाभ घेत आहेत.

Pune: तब्बल 28 लाख लिटर पाण्याचे होणार शुद्धीकरण – स्वप्नील दुधाने

काकडा आरती झाल्यानंतर माघ शुद्ध दशमीच्या निमित्ताने पहाटे श्री पांडुरंग व संत तुकाराम महाराजांच्या मूर्तींना संत तुकाराम सहकारी कारखान्याचे संचालक मंडळ यांच्या शुभहस्ते अभिषेक करून महापूजा करण्यात आली.

गाथामूर्ती हभप नानामहाराज तावरे यांच्या सुमधूर वाणीतून सकाळच्या पहिल्या सत्रातील गाथा पारायण झाल्यानंतर उपस्थिती वारकरी भाविक व ट्रस्टचे सर्व कार्यकर्ते यांच्यावतीने भंडारा डोंगरावर मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात शिवजयंती धुमधडाक्यात साजरी करण्यात आली. मुख्य मंदिरात शिवज्योत प्रज्वलित करून ढोल ताशांच्या गजरात शोभायात्रेसह मंदिर ते मुख्य मंडपापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. इंदुरीच्या ठाकरवाडी व खांडी बोरवलीचे ढोल पथक यामध्ये सामील झाले होते.

शोभायात्रेत देवांश अजय हिंगे, अगस्त अनिल पिंपरकर हे बाल शिवाजीच्या वेशभूषेत व वीरा स्वप्नील घाटगे ही जिजाऊ मासाहेबांच्या वेशभूषेत सामील झाले होते. सौ. आर्या दिनेश चव्हाण व सौ. विद्या अरुण काशीद व भाविक महिलांनी शिवरायांचा पाळणा अत्यंत सुमधुर आवाजात सादर केला. युवा कीर्तनकार हभप अजयमहाराज बारस्कर व त्यांच्या सहका-यांनी तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाचा ‘गड आला पण सिंह गेला’ हा पोवाडा पहाडी आवाजात सादर करून उपस्थित भाविकांमध्ये जोश निर्माण केला.

आज दिवसभरात पुणे जिल्ह्याच्या विविध भागातील भाविक वारकरी, विणेकरी यांनी दिंडीने भंडारा डोंगरावर येत मंदिराला मोठ्या भक्तिभावाने प्रदक्षिणा घालत दर्शन घेतले तर अनेक महिला भगिनींनी फुगडीचा फेर धरत आनंद लुटला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

दुपारी 12 ते 2 या कालावधीमध्ये कलर वाहिनीवरील ‘सूर नवा-ध्यास नवा’ या 2021 मधील महापार्वाच्या विजेत्या महागायिका सौ. सन्मिती गणेश शिंदे व सहकारी यांनी ‘मोगरा फुलाला’ हा अभंगवाणीचा कार्यक्रम सादर केला.

या कार्यक्रमाचे खास वैशिष्ट म्हणजे शिवचरित्रकार, कीर्तनकार व महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा. गणेश शिंदे यांचे लाभलेले निरुपण. आज शिवजयंती व माघ शुद्ध दशमीचा जुळून आलेला सुवर्णयोग याचे औचित्य साधत प्रा. गणेश शिंदे यांनी आपल्या खास शैलीमध्ये निरुपणातून तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, प्रतापराव गुजर, शिवा काशीद, राजधानी रायगडचे स्थापत्यविशारद हिरोजी इंदलकर यांच्या पराक्रमाचे, शौर्याचे व राजांच्या प्रति असणारी निष्ठा असे अनेक प्रसंग सांगत उपस्थित भाविकांना शिवमय केले. सौ. सन्मिती शिंदे यांनी आपल्या सुमधुर, रसाळ आवाजात ‘बोलवा विठ्ठल – पाहावा विठ्ठल’, ‘वेडात मराठे वीर दौडले सात’, हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा’ इ. रचना सादर करीत उपस्थितांची दाद मिळवली.

 

संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक, माजी खासदार नानासाहेब नवले, भोसरीचे माजी आमदार विलास लांडे, पवना सहकारी बँकेचे संस्थापक, माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे आदी मान्यवरांनी आज या सोहळ्याला भेट दिली.

काल रात्री 8 वा. वारकरी संप्रदायातील जेष्ठ कीर्तनकार, हभप बंडातात्या कराडकर यांची कीर्तन सेवा संपन्न झाली. ‘अणु रेणुया थोकडा | तुका आकाशाएवढा ||’ जगदगुरु तुकाराम महाराजांच्या या अभंगावर हभप बंडातात्या कराडकर यांनी निरुपण करीत भंडारा डोंगर ट्रस्टने सर्वाच्या सहकार्याने उभारीत असलेल्या या भव्य-दिव्य मंदिर निर्माण कार्याचे कौतुक करीत येत्या वर्षभरात या मंदिराच्या कामासाठी दहा लाख रुपयांच्या निधी देण्याचे संकल्प केला.

 

आयोध्येचे राम मंदिर हे देशाचे भूषण आहे तर अखिल विश्वाच्या कल्याणासाठी पंचम वेद असणारी गाथा जिथे निर्माण झाली त्या भंडारा डोंगराच्या भूमीवर निर्माण होणारे हे भव्य-दिव्य मंदिर महाराष्ट्राचे भूषण आहे यासाठी महाराष्ट्रातील सर्व सज्जन भाविक जणांनी या कामी आर्थिक सहकार्य करावे, असे आवाहन बंडा तात्या कराडकर यांनी कीर्तन प्रसंगी केले.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.