Pune News : बॅकस्टेज कलाकारांचा राष्ट्रवादी उतरविणार विमा

एमपीसी न्यूज : कोरोना महामारीमुळे अनेक संकटांचा तडाखा बसलेल्या चित्रपटसृष्टी व नाट्यसृष्टीतील बॅकस्टेज कलाकारांचा प्रत्येकी पाच लाख रुपयांचा विमा उतरविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने पुढाकार घेतला आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री  अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बॅकस्टेज कलाकारांचा विमा उतरविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पुणे संवादचे अध्यक्ष सुनील महाजन यांच्याकडे पाच लाख रुपयांचा धनादेश शुक्रवारी सुपूर्द केला.

सध्या चित्रपटनिर्मिती आणि नाट्यप्रयोग बंद असल्यामुळे चित्रपटसृष्टी व नाट्यसृष्टीला अनेक संकटांचा तडाखा बसला आहे. त्यातही, नेपथ्य, प्रकाशयोजना, मेकअप आदी जबाबदारी सांभाळणाऱ्या बॅकस्टेज कलाकारांचे जगणे मुश्कील झाले आहे. अनेकांपुढे रोजी-रोटीचा प्रश्न आहे. कोरोनासारखा आजार झाल्यास उपचारासाठीही पैसे नाहीत, अशी अनेकांची स्थिती आहे.

ही परिस्थिती लक्षात घेऊन या बॅकस्टेज कलाकारांना किमान आरोग्योपचाराची हमी मिळावी, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने पुढाकार घेत या कलाकारांचा प्रत्येकी पाच लाख रुपयांचा विमा उतरविण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उपलब्ध करून दिलेल्या निधीतून संवाद पुणेचे सुनील महाजन यांच्याकडे विम्याचा पहिल्या वर्षीचा हप्ता भरण्यासाठी पाच लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.