Ravet : मेडिकल दुकान चालकावर वार करून रोकड लुटली

एमपीसी न्यूज – मेडिकल दुकान बंद करून घरी जात असताना आठ ते नऊ जणांच्या टोळक्याने दुकानदारावर धारदार शस्त्राने वार करून 52 हजार रुपये असलेली बॅग चोरून नेली. ही घटना बुधवारी (दि. 11) रात्री मुकाई चौक, रावेत येथे घडली.

जगदीश भुंडाराम चौधरी (रा. संत तुकाराम नगर, पिंपरी) असे जखमी दुकानदाराचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रावेत येथील मुकाई चौकाजवळ बन्सल विस्टा इमारतीमध्ये जगदीश चौधरी यांचे मेडिकल दुकान आहे. बुधवारी रात्री सव्वादहाच्या सुमारास मेडिकल दुकान बंद करून घरी जात असताना अचानक आलेल्या आठ ते नऊ जणांच्या टोळक्याने जगदीश यांच्यावर धारदार हत्याराने वार केले. यामध्ये जगदीश जखमी झाले. टोळक्याने जगदीश यांच्या हातातील 52 हजार रुपये असलेली बॅग चोरून नेली. घटनेनंतर आरोपींनी मोटारसायकल वरून पोबारा केला. परिसरातील नागरिकांनी जगदीश यांना पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर त्यांना चिंचवड येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.