Bhosari : पिंपरी-चिंचवड शहरात भोसरीची सांस्कृतिक चळवळ म्हणून ओळख व्हावी – खासदार शिवाजीराव आढळराव पाटील

एमपीसी न्यूज –   भोसरी कला क्रीडा मंचाने सातत्य राखत “भोसरी महोत्सव 2018’द्वारे नागरिकांना विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी दिली आहे. त्याचप्रमाणे अखंडपणे सांस्कृतिक चळवळही पुढे चालवत आहे. त्यामुळे भोसरीची सांस्कृतिक अशी ओळखही पिंपरी-चिंचवड शहरात नव्याने निर्माण होऊ पहात आहे. असे मत खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी भोसरीत मांडले.

भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहात मंचद्वारे आयोजित केलेल्या “भोसरी महोत्सव 2018’चे उद्घाटन खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. या वेळी ते बोलत होते. या वेळी आमदार महेश लांडगे, अखिल भारतीय नाट्यपरिषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, नगरसेवक संतोष लोंढे, अभिनेते दिगंबर नाईक, सूचित जाधव, बाळासाहेब गव्हाणे, धनंजय आल्हाट, नंदू दाभाडे, अभिनेत्री सोनाली गायकवाड, अमृत पऱ्हाड आदी उपस्थित होते.
खासदार आढळराव पाटील पुढे म्हणाले, “”सांस्कृतिक चळवळ सुरू करणाऱ्या मंचासारख्या संघटनेला राजाश्रय मिळणे गरजेचे आहे.”

या वेळी आमदार महेश लांडगे म्हणाले, “”कुस्ती, कबड्डीसह भोसरी गावाला नाटकाची परंपरा आहे. 1950 ते 1970 पर्यंत गावातील कलाकारांद्वारे नाटके बसवून त्याचे खेळ गावागावात लावले जात. मात्र नाटकाद्वारे आलेला पैसा हा भोसरी गावाच्या विकासासाठी वापरला जात असे. त्यामुळे भोसरीने कलेबरोबरच सामाजिकतेचेही भान जपले आहे. याच परंपरेचा वारसा भोसरी कला क्रीडा महोत्सवानेही जपले आहे.”

भाऊसाहेब भोईर म्हणाले,”पिंपरी-चिंचवडच्या सहकार्याने होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नियोजन समितीवर कलेची जान नसलेले पदाधिकारी असल्याने पिंपरी-चिंचवड परिसरात दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमाची वानवा आहे. सांस्कृतिक चळवळीस बळ देण्यासाठी नागरिकांनी भोसरी महोत्सव सारख्या कार्यक्रमास चांगला प्रतिसाद दिला पाहिजे.”
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगरसेवक व मंचाचे अध्यक्ष ऍड. नितीन लांडगे यांनी केले. सूत्रसंचालन विजय फुगे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.