Pimpri: महिलांना प्रशिक्षण देण्याचे काम अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेलाच !

महिला व बालकल्याण समितीचा निर्णय

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील महिलांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देणाचे काम अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेलाच दिले जाणार आहे. त्याला महिला व बालकल्याण समितीच्या सभेत मान्यता देण्यात आली. दरम्यान, या संस्थेच्या चौकशीची मागणी भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप केली होती.

पालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागांतर्गत महिलांसाठी ज्ञान कौशल्य वाढ विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविला जातो. गेल्या अनेक वर्षे महिलांना प्रशिक्षण देण्याचे काम अखिल भारतीय स्थानिक संस्था करत आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी या भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी या संस्थेच्या चौकशीची मागणी केली होती. तसेच तत्कालीन महिला व बालकल्याण समिती व स्थायी समितीनेही या संस्थेच्या कामावर संशय व्यक्त केला होता. एप्रिल महिन्यात महिला सबलीकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश स्थायी समितीने दिले होते. तसेच या संस्थेऐवजी महिलांच्या व्यवसायाला चालना देण्याचा निर्णय घेत त्यासाठी खासगी कंपन्यांच्या ‘सीएसआर’ योजने अंतर्गत मदत घेण्याची निर्णय घेतला होता.

दरम्यान, याच संस्थेला पुन्हा महिला प्रशिक्षणाचे काम देण्याचा ठराव मागील आठवड्यात महिला व बालकल्याण समितीने घेतला. त्यानंतर पुन्हा मंगळवारी (दि.18) झालेल्या सभेत सदर संस्थेला काम देण्यासाठी दुरुस्तीचे वेगवेगळे तीन ठराव करण्यात आले. त्यात सभावृत्तांत कायम होण्याची वाट न बघता अंमलबजावणी करण्याचेही समितीने सूचित केले आहे.

सभापती स्वीनल म्हेत्रे म्हणाल्या, “महिलांना प्रशिक्षण देण्यासाठी अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेसारखी पात्रता असलेली दुसरी संस्था नाही. महिला विविध प्रकारच्या प्रशिक्षणापासून वंचित राहू नयेत यासाठीच या संस्थेला काम देण्यात आले आहे”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.