Pune : ताई अशीच सदैव पाठीशी उभा रहा ! मराठा आंदोलकांनी बांधल्या भगिनींना राख्या

एमपीसी न्यूज – आज सर्वत्र मोठ्या उत्साहात रक्षाबंधन हा सण साजरा केला जात आहे. साधारणपणे या दिवशी बहीण भावाला राखी बांधते मात्र पुण्यात काहीसं वेगळं चित्र पहायला मिळालं.  मराठा आंदोलनादरम्यान ठामपणे पाठीशी उभे राहिलेल्या मराठा भगिनींना राख्या बांधून मराठा आंदोलकांनी पुण्यात रक्षबंधन हा सण साजरा करण्यात आला. गेल्या ७ दिवसांपासून पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने बेमुदत चक्री उपोषण सुरू आहे. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येने आज महिला उपस्थित होत्या. 

बहीण-भावामधील नाते दृढ करणारा सण म्हणजे रक्षाबंधन. या दिवशी बहीण भावाला राखी बांधते तर रक्षण तसेच प्रोत्साहन देण्याचं वचन भाऊ आपल्या बहिणीला देतो. मागील कित्येक वर्षांपासून मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित असून  पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून अनेक मराठा भगिनी या आंदोलनात सहभागी झाल्या. नुसत्या सहभागीच झाल्या नाहीत तर या आंदोलनात यशस्वीपणे नेतृत्व देखील करत आहेत.
पुण्यात विभागीय आयुक्त कार्यालयाबाहेर सध्या मराठा क्रांती मोर्च्यांच्या वतीने चक्री उपोषण सुरू असून या ठिकाणी आगळ्या वेगळ्या पद्धतीने रक्षा बंधन हा सण साजरा करण्यात आला. महिलांनी पुरुष आंदोलकांना राख्या बांधल्यानंतर चक्क पुरुष आंदोलकांनी या महिलांना राख्या बांधून कृतज्ञता व्यक्त केली. तर महिला भगिनींनी आंदोलनाच्या शेवटपर्यंत पाठीशी उभे राहण्याचं आश्वासन दिलं.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.