Pune : पिस्टल व काडतुसांसह सराईत गुन्हेगार जेरबंद

युनिट 3 ची कारवाई

एमपीसी न्यूज – पोलीस अभिलेखावरील एक सराईत गुन्हेगाराला दोन पिस्टल आणि चार काडतुसांसह जेरबंद करण्यात आले आहे. युनिट तीनच्या पोलिसांनी काल शुक्रवारी (दि.10) ही कारवाई केली.

अजय पांचाळ (रा. जांभूळवाडी रोड, आंबेगाव खूर्द, ता. हवेली, जि. पुणे), असे या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, युनिट तीन चे अधिकारी आणि कर्मचारी हद्दीमध्ये गस्त घालत असताना पोलीस हवालदार संतोष क्षीरसागर यांना त्यांच्या खब-याकडून अजय हा एलोरा लॉज समोर, सदाशिव पेठ येथील सार्वजनिक रोडच्या कडेला त्याच्याजवळील पिस्टल विकण्यासाठी येणार आहे, अशी माहिती मिळाली.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून अजय याला अटक केली. त्याच्या जवळून दोन देशी बनावटीचे पिस्टल व चार जिवंत काडतुसे, असा एकूण एक लाख बेचाळीस हजार पन्नास रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. आरोपी अजयवर दत्तवाडी पोलीस ठाणे, भारती विद्यापीठ, हवेली पोलीस ठाणे येथे खून, खुनाचा प्रयत्न, घातकशस्त्र जवळ बाळगणे, असे गुन्हे दाखल आहेत. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता त्याला 15 मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पोलीस पुढील तपास करीत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.