Pimpri News : नोंदणीकृत व्यावसायिकांनी सात दिवसात थकीत एलबीटी भरावा, अन्यथा जप्तीची कारवाई

महापालिकेचा इशारा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थानिक संस्था कर (एलबीटी) विभागामार्फत शहरातील नोंदणीकृत व्यावसायिकांना एलबीटी भरण्याबाबत तीन पथकामांर्फत समक्ष नोटिसा बजाविल्या जात आहेत. व्यावसायिकांना कागदपत्रे सादर करण्यासाठी सात दिवसांची मुदत दिली आहे. त्यामुळे नोंदणीकृत एलबीटी व्यावसायिकांनी पुढील सात दिवसात थकीत एलबीटी भरावा. अन्यथा जप्तीची कारवाई करण्यात येईल, असा इशारा विभागाच्या उपायुक्त स्मिता झगडे यांनी दिला आहे.

राज्यातील सर्व महापालिका स्थानिक संस्था कर (एलबीटी) 1 एप्रिल 2013 रोजी लागू झाला. 2013 ते 2017 पर्यंत एलबीटी लागू होता. 30 जून 2017 रोजी एलबीटी रद्द करण्यात आला. पिंपरी-चिंचवड शहरातील 35 हजार 892 व्यावसायिकांनी महापालिकेकडे एलबीटीची नोंदणी केली. त्यापैकी आजअखेर केवळ 20 हजार 233 नोंदणीकृत एलबीटी धारकांनी एलबीटी भरला आहे. त्याबाबत अंतिम कर निर्धारण निश्चित करण्याची कार्यवाही सुरु आहे. 15 हजार 659 व्यावसीयाकांनी अद्यापही एलबीटी भरला नाही.

नोंदणीकृत एलबीटी धारकांना ई-मेल, एसएमएस, पोस्ट, दुरध्वनीद्वारे वारंवार कागदपत्रे सादर करण्यासाठी विभागामार्फत नोटिसा देण्यात येत आहेत. तथापि, त्यापैकी केवळ 10 एलबीटी धारक व्यावसायिकांनीच कागदपत्रे सादर केली. उर्वरित व्यावसायिकांना वारंवार कळवूनही कागदपत्रे सादन न केल्याने बेस्ट निकालाच्या आधारे, इतर शासकीय विभागातील उपलब्ध माहितीच्या आधारे एकूण 5 हजार 238 इतक्या संख्येच्या वार्षिक विवरणपत्रांबाबत नोंदणीकृत एलबीटी धारकांना, व्यावसायिकांना अंतिम कर भर निर्धारण आदेश बजाविण्यात आले आहेत.

अद्यापही एलबीटीचा भरणा न केलेल्या नोंदणीकृत व्यावसायिकांना त्वरीत एलबीटी भरण्याबाबत अंतिम सूचना म्हणून समक्ष नोटिसा बजाविल्या जात आहेत. त्यासाठी एलबीटी विभागामार्फत तीन पथके नियुक्त केले आहेत. कोरोना कालावधी लक्षात घेता कागदपत्रे सादर करण्यासाठी सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर मात्र एलबीटीची थकित रक्कम न भरल्यास अथवा कागदपत्रे सादर न केल्यास आपले काहीही म्हणने नाही असे समजून मिळकत कर वसुली कार्यवाही प्रमाणेच एलबीटीची थकीत रक्कम वसुल करण्यासाठी जप्ती, अटकावणीची कारवाई करण्यात येईल. त्यामुळे नोंदणीकृत एलबीटी व्यावसायिकांनी पुढील सात दिवसात थकीत एलबीटी भरावा. अन्यथा जप्तीची कारवाई करण्यात येईल असा इशारा विभागाच्या उपायुक्त झगडे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.