Pune News : पुणे शहरात निर्बंधांमध्ये शिथिलता द्या : महापौर मोहोळ

एमपीसी न्यूज – पुणे शहरात निर्बंधांमध्ये शिथिलता हवी असल्यास तसा प्रस्ताव पुणे महापालिकेकडून पाठवावा, अशी भूमिका आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केल्यानंतर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी तातडीने आरोग्यमंत्री टोपे यांना पत्र लिहून शिथिलता देण्यासंदर्भात प्रस्ताव सादर केला आहे. हा प्रस्ताव सादर करताना गेल्या तीन आठवड्यातील कोरोना आकडेवारीही मांडण्यात आली आहे. गेले तीन आठवडे पुणे महापालिका हद्दीचा पॉझिटिव्हीटी रेट 4 टक्क्यांपेक्षाही कमी असल्याचे या आकडेवारीमुळे समोर आले आहे.

महापौर मोहोळ यांनी निर्बंध शिथिल करण्यासंदर्भातील प्रस्ताव आरोग्यमंत्र्यांना पाठवला असून त्याबाबत बोलताना महापौर मोहोळ म्हणाले, ”पुणेकरांच्या आणि महापालिकेच्या वतीने निर्बंधांमध्ये शिथिलता देण्याची मागणी केली आहे. पुणे जिल्ह्यासाठी उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली दर आठवड्याच्या शेवटी होणाऱ्या बैठकीत निर्बंध शिथिल करण्यासंदर्भात मागणी करत आलो आहोत. त्यावर पालकमंत्र्यांनी सकारात्मकता दाखवली खरी पण, प्रत्यक्ष तसे आदेश अद्यापही निघालेले नाहीत”

”पुणे महापालिका हद्दीत 15 जुलै ते 21 जुलै या सप्ताहात एकूण 2 हजार 120 नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यासाठी झालेल्या चाचण्यांची संख्या 53 हजार 908 होती. म्हणजेच पॉझिटिव्हीटी रेट 3.93 टक्के इतका राहिला. 22 जुलै ते 28 जुलै 2021 दरम्यान 1 हजार 663 नवे रुग्ण नोंदवले. त्यासाठी 49 हजार 210 चाचण्या केल्या गेल्या. पॉझिटिव्हीटी रेट 3.37 टक्के नोंदवला गेला. अगदीच अलीकडच्या आठवड्याचे उदाहरण घ्यायचे झाले तर 29 जुलै ते 4 ऑगस्ट 2021 दरम्यान 50 हजार 777 चाचण्या केल्या असता नव्या 1 हजार 684 नव्या रुग्णांची नोंद झाली. म्हणजेच या काळात पॉझिटिव्हीटी रेट 3.31 टक्के राहिला. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, गेल्या पाच आठवड्यांपासून पॉझिटिव्हीटी दर सातत्याने घटत आहे. 2 ते 8 जुलै 2021 या सप्ताहात पॉझिटिव्हीटी रेट हा 5.00 टक्के होता. तो 30 जुलै ते 5 ऑगस्ट या सप्ताहापर्यंत 3.22 पर्यंत खाली आला आहे”, असे महापौर मोहोळ म्हणाले.

”पुणे शहरातील कोरोना संसर्ग स्थिती किती नियंत्रणात आहे, हे सांगण्यासाठी अलीकडच्या कालावधीतील आकडेवारी पुरेशी बोलकी आहे. शिवाय गेल्या 16 महिन्यांच्या कालावधीत समस्त पुणेकर राज्य सरकारच्या आदेशाचे पालन केले आहे. मात्र, सद्यस्थितीत दुपारी 4 पर्यंतची वेळ सर्वांसाठीच अडचणीची ठरत असून व्यावसायिक, नोकरदार, ज्येष्ठ नागरिक यांची सर्वांचीच निर्बंधांत शिथिलता द्यावी, अशी मागणी आहे. या पार्श्वभूमीवर समस्त पुणेकरांच्या वतीने निर्बंध काही प्रमाणात शिथील करुन पुणेकरांना न्याय द्यावा, अशी मागणी आहे, ” असे महापौर मोहोळ म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.