Pimpri News : लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांची पिंपरीतील टाटा मोटर्स प्रकल्पाला भेट

एमपीसी न्यूज – भारतीय लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी पिंपरीतील टाटा मोटर्सच्या प्रकल्पाला आज (शुक्रवारी, दि.06) भेट दिली. लष्करप्रमुख दक्षिण कमानच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी टाटा मोटर्सच्या कारखान्याला भेट देऊन पॅसेंजर आणि कमर्शियल वाहनांच्या असेम्ब्ली लाईनची कार्यपद्धती जाणून घेतली. तसेच, अभियांत्रिकी संशोधन केंद्राला भेट दिली.

झेनॉन, एडब्लूडी (4×4) ट्रूप कॅरियर, लाईट बुलेट प्रूफ व्हेइकल व कॉम्बॅट सपोर्ट व्हेईकल्स, माइन प्रोटेक्टेड व्हेईकल्स आणि व्हील्ड आर्मर्ड ॲम्फिबियस प्लॅटफॉर्म एडब्लूडी (8×8) कॉन्फिगरेशनसह टाटा वाहनांची श्रेणी यावेळी प्रदर्शित करण्यात आली होती.

आजच जनरल नरवणे यांनी तळेगाव येथील लार्सन अँड टुब्रोच्या स्ट्रॅटेजिक सिस्टीम कॉम्प्लेक्स (एसएससी) ला भेट देऊन त्यांच्या उत्पादन सुविधा आणि भारतीय सशस्त्र दलांचे आधुनिकीकरण करण्याच्या विकासाबाबत सुरू असलेल्या प्रयत्न यांची पाहणी करून माहिती घेतली. यावेळी संरक्षण संबंधी भारतीय लष्करासह एल अँड टी च्या सहभागाबद्दल लष्करप्रमुखांना माहिती देण्यात आली. लष्करप्रमुखांनी आत्मनिभर भारताला प्रोत्साहन देणा-या दोन्ही स्वदेशी उत्पादकांच्या प्रयत्नांची प्रशंसा केली.

उद्या (दि. 07) लष्करप्रमुख जनरल एमएम नरवणे गोव्यातील आयएनएस हंसाला भेट देणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.