Vadgaon : मावळातील शेतकऱ्यांना दिलासा; शेती अवजारांसाठी बांधावर डिझेल उपलब्ध

राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे यांच्या हस्ते योजनेचा शुभारंभ

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद पुणे व भारत पेट्रोलियम कंपनीच्या संयुक्त विद्यमाने नवलाख उंबरे ( ता. मावळ) या ठिकाणी डिझेल व्हॅनच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बांधावर डिझेल उपलब्ध करण्याच्या योजनेचा शुभारंभ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मावळ तालुका अध्यक्ष बबनराव भेगडे यांच्या हस्ते करण्यात आला.

मावळ तालुक्यामध्ये उत्तम नियोजनामुळे कोरोना रोग हा आटोक्यात आहे. या पुढेही तो आटोक्यात राहण्यासाठी प्रशासनामार्फत मोठ्या प्रमाणात नाकाबंदी करण्यात आलेली आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांना ट्रॅक्टर, मळनियंत्र इत्यादी अवजारांना वेळेत डिझेल न मिळाल्यामुळे शेतीची कामे खोळंबळी आहेत.

याबाबत शेतकऱ्यांनी तोडगा काढण्याची विनंती पुणे जिल्हा कृषि व पशुसंवर्धन समितीचे सभापती बाबुराब (आप्पा) वायकर यांच्याकडे करण्यात आली. दरम्यान, ही बाब लक्षात घेऊन सभापतींनी जिल्हा परिषद पुणे व भारत पेट्रोलियम कंपनीच्या संयुक्त विद्यमाने नवलाख उंबरे या ठिकाणी  डिझेल व्हॅनच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या बांधावर डिझेल उपलब्ध करण्याच्या योजनेचा शुभारंभ राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष बबनराव भेगडे यांच्या हस्ते करण्यात आला.

याप्रसंगी कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती बाबुराव आप्पा वायकर, गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी, पुणे जिल्हा कृषी अधिकारी संजय विश्वासराव, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (ब्लाॅक) अध्यक्ष सुभाषराव जाधव, पंडित जाधव, सरपंच दत्तात्रय पडवळ, वडगाव मावळचे कृषी अधिकारी संताजी जाधव, विश्वास कदम, दादा पडवळ, विशाल पडवळ, भरत जाधव, संदीप बधाले आदी मान्यवर उपस्थित होते.

आंबी येथे ‘शरद भोजन’च्या लाभार्थ्यांना अन्नधान्य वाटप

जिल्हा परिषद पुणे अंतर्गत शरद भोजन योजनेतील पाचशेच्या पेक्षा जास्त पात्र लाभार्थ्यांना आंबी (ता.मावळ) येथे अन्न धान्याचे वाटप करण्यात आले.

कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती बाबुराव वायकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष बबनराव भेगडे, गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी, सुभाषराव जाधव, माजी सभापती गुलाबराव म्हाळस्कर, माजी उपसरपंच जितेंद्र घोजगे, सरपंच बायडाबाई गराडे, विद्यमान उपसरपंच बाबासाहेब घोजगे व ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.