Rickshaw meter Recalibration : रिक्षा मीटर प्रमाणीकरण पिंपरी चिंचवडमध्ये का नाही? – काशिनाथ नखाते

एमपीसी न्यूज : रिक्षा चालकांच्या मागणीनुसार प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने आजपासून रिक्षाचालकांची भाडेवाढ पहिल्या किमीसाठी 25 रुपये, त्यानंतर प्रत्येक किमीसाठी 17 रुपये प्रमाणे भाडेवाढ केली. या निर्णयाचे रिक्षा चालकानीं आज पेढे वाटून स्वागत केले. मात्र, या दरवाढ आकारणीसाठी रिक्षाचे मीटर पुनः प्रमाणीकरण (Rickshaw meter Recalibration) करण्यासाठी पुणे परिसरात पाच ठिकाणी सकाळी सात ते दुपारी चारपर्यंत मीटर प्रमाणीकरण करण्यात येणार आहे. पिंपरी चिंचवड शहरात 25000 पेक्षा अधिक रिक्षा चालक असून त्यांच्या सोयीसाठी शहरात रिक्षा मीटर प्रमाणीकरण सुविधा का नाही? पिंपरी चिंचवड शहराला दूजाभाव का? असा प्रश्न कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी विचारला.

कष्टकरी संघर्ष महासंघ, सारथी चालक मालक महासंघाच्या दरवाढीच्या प्रयत्नाला यश आले. महासंघातर्फे आज रिक्षा चालकांनी भाडेवाढीचे पेढे वाटून काळेवाडी, पिंपरी, निगडी येथे स्वागत करण्यात आले. यावेळी कामगार नेते काशिनाथ नखाते, निमंत्रक नाना कसबे, अधिक बोऱ्हाडे, दिनकर खांडेकर, अशोक पवार, राम कांबळे, राजाराम होनमाने, बालाजी भोसले, गुलाब बागवान, काशीम तांबोळी, सहदेव होनामाने, राजू बोराडे आदीसह रिक्षाचालक उपस्थित होते .

महासंघाने इंधन दरवाढ, सीएनजी दरवाढीचा निषेध करत भाडेवाढीची मागणी आणि इंधन दर कमी करण्याची मागणी केली होती. यावेळी नखाते म्हणाले, की आज पासून रिक्षा चालकांची भाडे वाढ होत आहे. अनेकजण पुण्यात जाऊन व्यवसाय करत आहेत. रिक्षा मीटर कॅलिब्रेशन (Rickshaw meter Recalibration) म्हणजे पुन: प्रमाणीकरण 31 ऑक्टोबर पर्यंत करून घेणे गरजेचे आहे, हे नाही केले तर भाडेवाढ घेता येणार नाही, घेतल्यास कडक कारवाई करण्याचे आरटीओ करून सांगण्यात येत आहे.

पुणे येथे कर्वेनगर, फुलेनगर ,आळंदी रस्ता, रामटेकडी, दिवे आणि खराडी या पाच ठिकाणी पुन: प्रमाणीकरण करण्याची सोय करण्यात आली. मात्र, पिंपरी चिंचवडच्या 25000 रिक्षा चालकांना एवढ्या दूर जाऊन हे करणे अत्यंत चुकीचे आहे व सोयीचे ठरणार नाही, तसेच रांगा लागणार म्हणून हे वेळखाऊ धोरण आहे. परिणामी रिक्षा चालकांच्या आर्थिक नुकसान होणारे आहे, म्हणून पिंपरी चिंचवडमध्ये तीन ठिकाणी पुन: प्रमाणीकरण सुरू करण्यात यावे आणि पुणे पिंपरी चिंचवड मिळवून एक लाख दहा हजार पेक्षा अधिक रिक्षा चालकांच्या सोयीसाठी याहीपेक्षा अधिक ठिकाणी अशी सुविधा करावी. त्याही पुढे जाऊन नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून असे कॅलिब्रेशन करून घ्यावे. तसेच, आरटीओकडून दुचाकी वाहनावरून होत असलेली प्रवाशी वाहतूक त्वरित बंद करावी. अशी मागणीही यावेळी रिक्षाचालकांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.