Ganeshotsav Competition : राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाकडून पुरस्कार

एमपीसी न्यूज : या वर्षीच्या गणेशोत्सवाकरीता (Ganeshotsav Competition) राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना स्पर्धा घेऊन पुरस्कार देण्याचा निर्णय राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने घेतला असून सहभागी गणेश मंडळांकडून 2 सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत.

राज्यस्तरावरील प्रथम क्रमांकास रुपये पाच लाख, द्वितीय क्रमांकास रुपये दोन लाख 50 हजार आणि तृतीय क्रमांकास रुपये एक लाख इतक्या रकमेचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन मंडळांना गौरविण्यात येणार आहे. तसेच, प्रत्येक जिल्ह्यातील प्रथम क्रमांकांच्या गणेशोत्सव मंडळास 25 हजार रुपयांचे पारितोषिक आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या गणेशोत्सव मंडळांची धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे. किंवा स्थानिक पोलिस स्थानक अथवा स्थानिक स्वराज्य संस्था यांची परवानगी घेणे आवश्यक आहे.

MPC News Online Bappa : एमपीसी न्यूज ऑनलाईन बाप्पा स्पर्धेत सहभागी व्हा, जिंका चांदीची नाणी!

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्य शासनाचे संकेतस्थळ www.maharashtra.gov.in आणि पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या www.pldeshpandekalaacademy.org या संकेतस्थळावर अर्ज उपलब्ध करून देण्यात आला आहे. विहित नमुन्यातील अर्ज [email protected] या ई मेल वर 2 सप्टेंबर 2022 पर्यंत दाखल करता येतील. उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांची निवड विशिष्ट निकषांच्या आधारे गुणांकन देऊन जिल्हास्तरीय समिती तसेच राज्यस्तरीय समितीमार्फत करण्यात येईल.

 स्पर्धेसाठी निकष : Ganeshotsav Competition

मूर्ती पर्यावरणपुरक असावी. सजावट पर्यावरणपुरक म्हणजेच यात थर्माकोल, प्लॅस्टीक आदी साहित्य असता कामा नयेत. गणेश मंडळाचे वातावरण ध्वनीप्रदुषणरहित असावे. पाणी वाचवा, मुलगी वाचवा, अंधश्रद्धा निर्मूलन, सामाजिक सलोखा, इत्यादी समाज प्रबोधन विषयावर देखावा,सजावट असावी. स्वातंत्र्याच्या चळवळी संदर्भातील देखावा, सजावट याला अधिक गुण दिले आहेत. रक्तदान शिबीर, वैद्यकीय सेवा शिबिर, शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थीनी यांच्या शैक्षणिक, आरोग्य, सामाजिक इत्यादी बाबत केलेल्या कार्याचे मूल्यमापन होईल. महिला, ग्रामीण भागातील वंचित घटक यांच्या शैक्षणिक, आरोग्य, सामाजिक इत्यादी बाबत मंडळाचे कार्य असावे. पारंपारिक सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धा, पारंपारिक, देशी खेळाच्या स्पर्धा याचबरोबर गणेश भक्तांसाठी देत असलेल्या प्राथमिक सुविधा यामध्ये पाणी, प्रसाधनगृहे, वैद्यकीय प्रथमोपचार, परिसरातील स्वच्छता, वाहतुकीस अडथळा येणार नाही असे नियोजन,आयोजनातील शिस्त याबाबी प्राधान्याने गुण देताना विचारात घेतल्या जाणार आहेत. अर्ज करताना कोणतेही शूल्क आकारण्यात येणार नाही.

अधिकाधिक गणेश मंडळांनी स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.