Mumbai News : संभाजीराजे छत्रपती यांचे उपोषण मागे, राज्य सरकारने ‘या’ मागण्या केल्या मान्य

एमपीसी न्यूज – मागील तीन दिवसांपासून मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी आझाद मैदानावर उपोषणाला बसलेल्या युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी अखेर आज उपोषण मागे घेतले आहे. मराठा समाजाच्या मागण्या राज्य सरकारने मान्य केल्याने हे उपोषण सोडत असल्याचं खासदार संभाजीराजे यावेळी म्हणाले.

राज्य सरकारच्या वतीने नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी संभाजीराजे छत्रपती यांची भेट घेतली. घटनास्थळी असलेल्या लहान मुलाच्या हातून रस पिऊन संभाजीराजे यांनी उपोषण सोडले.

राज्य सरकारने ‘या’ मागण्या केल्या मान्य – 

  • अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला चालू आर्थिक वर्षात 80 कोटी आणि उर्वरित 20 कोटी देण्याचा निर्णय घेण्यात आला असून अतिरिक्त निधी सुद्धा दिला जाईल.
  • विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कर्जावरील व्याज परताव्यासाठी धोरण ठरवलं जाईल.
  • सारथीमधील रिक्त पदं 15 मार्च 2022 पर्यंत भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
  • सारथीकडून महिन्याभरात कौशल्य विकासाचे कार्यक्रम सुरू करण्यात येतील तसेच सारथीअंतर्गत अभ्यासक्रमांमध्ये आणखी वाढ करण्यात येईल. तज्ज्ञांचा सल्ला घेऊन पुढील कार्यक्रम 30 जून 2022 पर्यंत जाहीर करण्यात येईल.
  • सारथी संस्थेच्या 8 उपकेंद्रांसाठी जमीन देण्याचा प्रस्ताव 15 मार्च 2022 पर्यंत मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर करण्यात येईल.
  • मराठा आंदोलकांवरील दाखल गुन्हा मागे घेण्यासाठी गृहमंत्रालयाकडून पाठपुरावा केला जाईल. व्हिडिओ फुटेजमध्ये ज्यांचा सहभाग नाही त्यांचे गुन्हे मागे घेण्यासाठी निर्णय घेण्यात येईल.
  • मराठा आंदोलनात मृत पावलेल्या वारसदारांना आश्वासन दिलेल्या आणि प्रलंबित राहिलेल्या नोकऱ्या तातडीने कागदपत्रांची पूर्तता करून दिल्या जातील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.