Sanjay Raut : ‘मुंबई ही मराठी माणसाच्या बापाचीच’ ; संजय राऊत यांचा कंगनावर पलटवार

अभिनेत्री कंगना राणावत आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यातील वाद चांगला चिघळला असून आता दोघांमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे.

एमपीसी न्यूज – ‘नऊ सप्टेंबरला मुंबईत येतेय, कोणाच्या बापाची हिंमत असेल तर थांबून दाखवा’ असं वक्तव्य करत कंगना राणावतने एक प्रकारे तिच्यावर टीका करणाऱ्यांना चॅलेंज दिले आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कंगना राणावतवर पलटवार करत ‘मुंबई ही मराठी माणसाच्या बापाचीच आहे…ज्यांना हे मान्य नसेल त्यांनी त्यांचा बाप दाखवावा..शिवसेना अशा महाराष्ट्र दुष्मनांचे श्राद्ध घातल्या शिवाय राहाणार नाही’, असं ट्विट करीत कंगनाला सणसणीत प्रत्युत्तर दिले आहे.

अभिनेत्री कंगना राणावत आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यातील वाद चांगला चिघळला असून आता दोघांमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. मुंबई पोलिसांवर टीका करत कंगना राणावतने मुंबईची अवस्था पाकव्याप्त काश्मीर सारखी झाली असल्याची टीका केली होती.

त्यावर नेटकऱ्यांनी कंगनाचा चांगलाच खरपूस समाचार घेतला होता. त्यानंतर कंगना राणावतने आणखी एक ट्विट करत वादाला तोंड फोडले आहे.

‘बरेच लोकं मला मुंबईत परत येऊ नकोस अशी धमकी देत आहेत. म्हणून मी येत्या आठवड्यात नऊ सप्टेंबर रोजी मुंबईत येण्याचा निर्णय घेतला आहे. जेव्हा मी मुंबई विमानतळावर उतरेन तेव्हा पोस्ट करेन. कोणाच्या बापाची हिंमत असेल तर थांबून दाखवा’ या आशयाचे ट्विट कंगनाने केले आहे.

_MPC_DIR_MPU_II

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अगदी शिवसेनेच्या भाषेत कंगनावर निशाणा साधत पलटवार केला आहे.

‘मुंबई ही मराठी माणसाच्या बापाचीच आहे…ज्यांना हे मान्य नसेल त्यांनी त्यांचा बाप दाखवावा..शिवसेना अशा महाराष्ट्र दुष्मनांचे श्राद्ध घातल्या शिवाय राहणार नाही. promise. जय हिंद, जय महाराष्ट्र’ असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे.

कंगनाने केलेल्या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर तिच्याविरुद्ध संतापाची लाट उसळली आहे. मात्र, नऊ सप्टेंबरला खरंच ती मुंबईला येणार का? याकडे आता सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.