Pimpri News : पाणी रोखून शहरवासीयांना वेठीस धरू नका – संजोग वाघेरे

एमपीसी न्यूज – पाणीपुरवठा विभागाच्या टेंडर, टक्केवारीमध्ये स्वारस्य दाखविणा-या भाजपच्या भ्रष्ट कारभारामुळे पिंपरी – चिंचवडकरांना पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. महापालिकेतील सत्ताधा-यांनी शहरवासीयांचे पाणी रोखून त्यांना वेठीस धरू नये. अन्यथा सत्ताधारी भाजप आणि महापालिका प्रशासनाविरोधात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिला आहे.

पिंपरी – चिंचवडमधील विस्कळीत पाणीपुरवठ्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. या संदर्भात पाणी समस्या वाढविण्यास सत्ताधारी भाजप जबाबदार असल्याचे सांगत संजोग वाघेरे पाटील पुढे म्हणाले की, मागील तीन वर्षांपासून शहराला दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. नागरिक, विरोधी पक्षाचे नगरसेवक आणि लोकप्रतिनिधींमार्फत सातत्याने दररोज पाणीपुरवठा करण्याची मागणी होते. तरीही सत्ताधारी आणि प्रशासनाला दररोज पाणीपुरवठा करता आलेला नाही.

एकीकडे शहरात दररोज पाणीपुरवठा होत नसताना दुसरीकडे दिवसाआड पाणी देखील नागरिकांना सुरळीत दिले जात नाही. शहराच्या विविध भागात मागील काही दिवसांपासून विस्कळित पाणीपुरवठा होत आहे. वेळी अवेळी नागरिकांना पाणी सोडले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकाळात २४ पाणीपुरवठा देण्याचे नियोजन सुरू केले होते. परंतु, भाजप सत्तेत आल्यानंतर या नियोजनात पाणी फेरले गेले. सत्ताधारी भाजपच्या कारभा-यांना पाच वर्षात विस्कळीत पाणीपुरवठ्याचा प्रश्न निकाली काढता आलेला नाही. भरमसाठ कामे काढून सल्लागार, ठेकेदारांवर खर्च करण्याला त्यांच्यामार्फत प्राधान्य दिले गेले. त्यांच्या कार्यकाळात संपूर्ण शहरात दिवसाआड पाणीपुरवठा कायम आहे.

शहरातील नव्याने झालेल्या शेकडो बांधकामांना पाणी देण्यास महापालिका असमर्थ आहे. आंद्रा, भामा आसखेड धरणाचे पाणी आरक्षित करून ते शहरात आणण्याचे नियोजन राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून सुरु झाले. भाजपला त्या प्रकल्पाचे देखील नियोजन करता आलेले नाही.

भाजपच्या पदाधिकारी आणि कारभारी आमदारांकडून केवळ कामांची पाहणी करून महिना दोन महिन्यात शहराला पाणी मिळेल, अशा वल्गना सतत केल्या जात आहेत. परंतु, या कामाला गती देण्यासाठी काही करताना ते दिसत नाहीत. केवळ भुलथापा मारून, जनतेची दिशाभूल करून पाणीपुरवठ्यासाठी सत्ताधा-यांनी जनतेला वेठीस धरण्याचे काम केले आहे, ते थांबवावे आणि शहराला दररोज सुरळित पाणीपुरवठा करावा, अन्यथा त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस बोंबाबोंब आंदोलन करणार आहे, असे संजोग वाघेरे पाटील यांनी म्हटले आहे.

दिवसाआड पाणी, हेच भाजपचं शहर परिवर्तन?

पिंपरी चिंचवड शहरात सुरळीत पाणीपुरवठा व्हावा, यासाठी नियोजन करण्यात सत्ताधारी भाजपच्या कार्यकाळात प्रश्न अपयशी ठरले आहे. भाजपने स्मार्ट सिटी आणि शहर परिवर्तन कार्यालयाच्या माध्यमातून मूलभूत सोयी-सुविधा सक्षम करण्याचा दावा केला होता. स्मार्ट सिटीच्या कामांवर कोट्यवधींचा खर्च होत आहे. तर, शहर परिवर्तन कार्यालयाच्या नावाखाली सुमारे १३ कोटींचा खर्च केवळ सल्लागारावर केल्याची माहिती आहे. पाच वर्षापूर्वी दररोज असणारा पाणीपुरवठा भाजपने दिवसाआड केला, हेच परिवर्तन भाजपनं करून दाखवलं, अशी बोचरी टीका वाघेरे पाटील यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.