Mumbai: केवळ गुणगान करून संस्कृत वाढणार नाही; व्यवहारात वापर वाढविणे गरजेचे- राज्यपाल

Sanskrit will not grow just by chanting; It is necessary to increase the use of in practice - Governor Bhagat singh koshyari संस्कृत भाषेला देव वाणी, गिर वाणी म्हणून संबोधले जाते. या भाषेत गेयता आहे, संगीत आहे.

एमपीसी न्यूज – अनेक मोठ्या प्रमाणात बोलल्या जाणाऱ्या युरोपियन भाषांमधील साहित्य फारतर पाचशे वर्षे जुने आहे. मात्र अनेक भाषांची जननी असलेल्या संस्कृत भाषेतील साहित्य हजारो वर्षे जुने आहे. तत्वज्ञान, न्यायशास्त्र, खगोलशास्त्र, धनुर्विद्या, आरोग्यविद्या यांसह ज्ञान, विज्ञान व साहित्यरूपी मोती या भाषेच्या महासागरात आहेत. मात्र केवळ संस्कृतचे गुणगान करून ही भाषा वाढणार नाही, तर तिचा उपयोग दैनंदिन व्यवहारात करावा लागेल. सर्वांनी संस्कृत भाषेच्या संवर्धनासाठी प्रयत्न केले. तर नवी पिढी संस्कृत भाषेला जागतिक भाषेच्या दृष्टीने पाहील, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातर्फे आयोजित ‘संस्कृत : सर्व भाषांचे उगमस्थान: गतकाळ आणि वर्तमानातील प्रासंगिकता’ या विषयावरील चर्चासत्राचे उद्घाटन राजभवन, मुंबई येथून करताना राज्यपाल बोलत होते.

संस्कृत भाषेने अखिल भारतवर्षाला एकात्मतेच्या धाग्याने जोडले आहे असे सांगताना जे मंत्र रामेश्वरम, जगन्नाथ पुरी, द्वारका व बद्रिकेदार येथे म्हटले जातात, तेच मंत्र काठमांडू येथील पशुपतीनाथ मंदिरात देखील गायले जातात असे राज्यपालांनी सांगितले.

_MPC_DIR_MPU_II

संस्कृत भाषेला देव वाणी, गिर वाणी म्हणून संबोधले जाते. या भाषेत गेयता आहे, संगीत आहे. संगीतामुळे तिला मधुरता लाभली आहे. त्यामुळे ध्वनी विज्ञान व संगीताच्या दृष्टीकोनातून देखील तज्ज्ञांनी संस्कृत भाषेला अभ्यासावे अशी सूचना राज्यपालांनी यावेळी केली.

संस्कृत संपूर्ण देशाची कुंजी आहे. संस्कृत भाषेतील सुभाषिते प्रेरणादायी आहेत. संस्कृत भाषा शिकून भाषणात सुभाषितांचा वापर केल्यास लोकनेत्यांची भाषणे अधिक प्रभावी होतील अशी टिप्पणी राज्यपालांनी केली.

चर्चासत्राच्या उद्घाटन समारोहाला विद्यापीठाच्या कुलगुरु मृणालिनी फडणवीस, कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरु श्रीनिवास वरखेडी, पुणे येथील डेक्कन विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु प्रसाद जोशी, प्र-कुलगुरु देबेन्द्रनाथ मिश्र, कुलसचिव विकास घुटे, भाषा व साहित्य विभागाचे प्रभारी संचालक प्रभाकर कोळेकर यांसह देशभरातील 800 प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी व संस्कृत भाषा प्रेमी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.