Talegaon : चारित्र्यसंपन्न शिक्षण देण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रयत्नशील – कुलगुरु डॉ. करमळकर

इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेतर्फे केरळ पूरग्रस्तांसाठी पाच लाखाचा निधी सुपूर्द

एमपीसी न्यूज – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ समाजोपयोगी आणि चारित्र्यसंपन्न शिक्षण देण्यासाठी प्रयत्नशील आहे. विद्यार्थी केंद्रस्थानी ठेवून विद्यापीठ हे प्रत्येक विद्याशाखेमध्ये नाविन्यपूर्ण बदल घडवणारे अभ्यासक्रम तयार करत आहे, असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी व्यक्त केले.

तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या विद्यार्थ्यांनी केरळ पूरग्रस्तांसाठी जमा केलेला पाच लाख रुपये निधी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडे सुपूर्द करण्यात आला. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही यावेळी करण्यात आला. त्यावेळी डॉ. करमाळकर बोलत होते.

कांतीलाल शहा विद्यालयाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळ व राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. प्रभाकर देसाई, संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार कृष्णराव भेगडे, कार्यवाह रामदास काकडे, खजिनदार केशवराव वाडेकर, महाविद्यायालाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, निरुपा कानिटकर, बी. फार्मसीचे प्राचार्य बी. बी. जैन, डी. फार्मसीचे प्राचार्य एन. शिंदे, बी.एस्सी विभागप्रमुख प्रा. स्मिता भेगडे आदी मान्यवर उपस्थित होते.

कुलगुरु डॉ. करमाळकर पुढे म्हणाले, “आज केवळ पारंपरिक शिक्षणाकडे न पाहता कौशल्याधारित शिक्षणासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. तसे झाल्यास उद्याचा भारत अमेरिकेच्या जागी दिसेल. विद्यार्थी जेव्हा मोठा होतो, तेव्हा विद्यापीठही आपोआप मोठे होत असते. आपण नुसते नोकरी शोधणारे न होता, नोकरी देणारेही व्हावे. त्यासाठी विद्यापीठ स्तरावर अभ्यासक्रमात बदल करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. सध्याचे तंत्रज्ञानाचे जग असल्याने विद्यार्थ्यांना कौशल्याधारित शिक्षण देणार आहोत. विद्यापीठाने मराठा चेंबर ऑफ कॉमर्ससोबत करार केला असून, त्याअंतर्गत वाणिज्य विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांना अनुभवाधारित शिक्षण देण्याचा प्रयत्न असणार आहे. तसेच शिक्षणासाठी डिजिटल मीडियाचा जास्तीत जास्त वापर करण्याचा मानस आहे. चांगले शिक्षण मिळाले, तरच देश घडणार आहे, असेही डॉ. करमळकर यांनी सांगितले.

कृष्णराव भेगडे म्हणाले, “विद्यार्थी, प्राध्यापक यांनी केरळ पुरग्रस्तांसाठी निधी संकलित करून खारीचा वाटा उचलला आहे. शिक्षण घेत असतानाच विद्यार्थ्यांमध्ये समाजाकडे बघण्याचा दृष्टीकोण बदलत आहे, ही निश्‍चित स्वागतार्ह बाब आहे. शिक्षण पूर्ण झाल्यावर अर्थार्जनाचे काय ? याचा गांभीर्याने विचार होणे गरजेचे आहे. आज चाकण, पिंपरी-चिंचवड, मावळ भागात मोठमोठ्या कंपन्या उभ्या राहिल्या आहेत. पण त्याप्रमाणात कौशल्याधारित शिक्षण घेतलेले विद्यार्थी मिळत नाहीत. त्यामुळे विद्यापीठाच्या सहकार्याने तळेगाव दाभाडे परिसरात ‘स्किल डेव्हलपमेंट सेंटर’ सुरु करण्याचा मानस आहे ” असेही भेगडे म्हणाले.

संस्थेचे कार्यवाह रामदास काकडे यांनी प्रास्ताविकात संस्थेचा इतिहास सांगतानाच विद्यार्थ्यांनी केरळ पूरग्रस्तांसाठी जमविलेली रक्कम छोटी असली, तरी त्याचे मोल अधिक असल्याचे सांगितले.

सूत्रसंचालन प्रा. संदीप भोसले यांनी, तर निरुपा कानिटकर यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.