Pune News : ‘माझी नाहीस तर कोणाचीही नाहीस’ म्हणत प्रेयसीचा होऊ घातलेला विवाह मोडला

एमपीसी न्यूज : लग्न झालेलं असतानाही पूर्वाश्रमीच्या प्रेयसीला ‘माझी नाही तर कोणाचीही नाहीस’ म्हणत तिचा होऊ घातलेला विवाह मोडणाऱ्या प्रियकरा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. हवेली पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला. प्रशांत दिलीप हागवणे (रा. किरकटवाडी, ता. हवेली) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत २१ वर्षीय तरूणीने तक्रार दिली आहे. 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, पीडित तरुणी आणि प्रशांतची सोशल मीडियावर ओळख झाली होती. ओळखीचे रूपांतर मैत्रित झाले व मैत्रिची रूपांतर प्रेमात. त्यानंतर गेली तीन ते चार वर्ष दोघेही प्रेमात होते. त्यांना विवाह देखील करायचा होता. तरूणीच्या कुटूंबाने विवाहाला परवानगी देखील दिली होती. मात्र, तरुणीची जात वेगळी असल्याने प्रशांतच्या कुटूंबाचा या विवाहाला विरोध होता.

त्यानंतर प्रशांतने कुटूंबाच्या सांगण्यावरून दुसऱ्याच मुलीशी विवाह केला. त्यानंतर या तरूणीने प्रशांतची संपर्क बंद केला. परंतु, काही दिवसांनी पुन्हा प्रशांतने पिडीत तरूणीशी संपर्क साधण्यास सुरूवात केली. तिला दुसऱ्या क्रमांकावरून सतत फोनकरून त्रास दिला. तर, इन्स्टाग्रामवर “तु मला हवी आहेस, तु माझी नाही तर तुला मी कोणाचीही होऊ देणार नाही. मला नाही सहन होणार तु कोणाची झालेली. मला तुझ्यासोबत लग्न करायचे असून, आताच कागदपत्रे घेऊन ये, असे मेसेज त्याने केले.

तसेच, तरूणीचा हडपसरमधील एका तरूणाशी विवाह ठरला होता. त्या तरूणाची भेट घेऊन हा विवाह देखील प्रशांत याने मोडून तरूणीला त्रास दिला असल्याची माहिती महिला उपनिरीक्षक रुतुजा मोहिते यांनी दिली. या सततच्या त्रासाला कंटाळून तरूणीने पोलीसांकडे धाव घेऊन तक्रार दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.