Pune News : ‘त्याने’ फोन करण्याच्या बहाण्याने नंबर घेतला अन् तरुणीला रात्री-अपरात्री…

एमपीसी न्यूज : रस्त्याच्या कामासाठी आलेल्या एका तरुणाने फोन करण्याच्या बहाण्याने जवळच राहणाऱ्या तरुणीचा मोबाईल क्रमांक घेतला आणि नंतर त्याचा दुरुपयोग करत रात्री-अपरात्री फोन करून तिला अश्लील भाषेत बोलत, नको ते व्हिडिओ पाठवून तिचा विनयभंग केला. कोंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला. याप्रकरणी 25 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली असून दोन तरुणांविरोधात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी तरुणी कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धांडेकर नगर येथे राहते. काही दिवसांपूर्वी त्यांच्या घराशेजारी राहणाऱ्या व्यक्तीने रस्त्यावर खडी टाकण्यासाठी काही कामगारांना सांगितले होते. त्यानुसार आरोपी त्या ठिकाणी खडी टाकण्यासाठी आले होते. त्यावेळी खडी टाकण्यासाठी सांगणारे तक्रारदार तरुणीचे शेजारी तेथे नव्हते. त्यामुळे आरोपींनी त्या व्यक्तीला निरोप देण्याच्या बहाण्याने तरुणीचा मोबाइल क्रमांक घेतला.

मोबाईल क्रमांक मिळाल्यानंतर या तरुणांनी तरुणीला वेळोवेळी फोन करून कुठे आहेस, घरी आहेस का, अशी विचारणा करून त्रास दिला. मात्र, तरुणीने या प्रकाराकडे दुर्लक्ष केले. दरम्यान, १० ऑक्टोबरला आरोपींनी तरुणीच्या मोबाइलवर अश्लील व्हिडीओ पाठवून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. त्यानंतर संबंधित तरुणीने मदतीसाठी कोंढवा पोलिसात धाव घेत तक्रार दिली. त्यावरून गुन्हा दाखल झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.