Pune News : रविवारी लग्न झालं अन् सोमवारी नवरीने दगा दिला ! वाचा नेमकं काय घडलं

एमपीसी न्यूज : लग्न झाल्यानंतर अवघ्या दोनच दिवसात नवरीने घरातील रोख रक्कम साड्या आणि सोन्याचे दागिने घेऊन पळ काढल्याची घटना पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात उघडकीस आली. भोर पोलिस ठाण्यात या प्रकरणी नवरीसह मध्यस्थी करणाऱ्या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवरदेवाचे वडील कैलास लिंबोरे यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की भोर तालुक्यातील निगुडघर गावात लिंबोरे कुटुंबीय राहतात. त्यांचा मोठा मुलगा लग्नाला आला होता. त्यांनी गावाजवळच असणाऱ्या चापडगाव येथील बाबू जाधव यांना मुलासाठी मुलगी पाहण्यास सांगितले होते.

बाबू जाधव यांनी आणखी काही सहकाऱ्यांच्या मदतीने अहमदनगर तालुक्यातील पेडगाव येथील राजू देवकते यांची मुलगी लग्नासाठी असल्याचे सांगितले होते. लग्न जमून देण्यासाठी त्यांनी एक लाख 20 हजार रुपयांची मागणी केली. कैलास मोरे यांनी देखील त्याला होकार दर्शवला आणि मुलगी पाहण्यासाठी शुक्रवारी ते पेडगावला गेले होते. जाताना त्यांनी मुलीसाठी सोन्याचे मंगळसूत्र आणि साड्या घेतल्या होत्या. यावेळी मध्यस्थी असलेल्या बापजी चव्हाण, राजू बागडे यांनी मोरे यांच्याकडून साठ हजार रुपये घेतले.

दरम्यान पेडगाव येथे गेल्यानंतर मुलाला मुलगी पसंत पडली आणि त्यांनी लगेच लग्नही केले. रविवारी सायंकाळच्या सुमारास ते मुलीला घेऊन आपल्या गावी परतही आले. मुलाचे लग्न झाल्यामुळे घरातील सर्व जण आनंदात होते.

दरम्यान त्याच रात्री लिंबोरे कुटुंबियातील सर्वजण गाढ झोपेत असताना नवी नवरी असलेल्या मनीषाने घरातील सोने, साड्या आणि रोख पाच हजार रुपये घेऊन पळ काढला. सकाळी उठल्यानंतर लिंबू रे कुटुंबियांच्या लक्षात हा प्रकार आला आणि त्यांनी पोलिस स्टेशन गाठून तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.