Ganeshotsav : पुण्यातील मानाची सात मंडळे 2023 साली काश्मीरमध्ये साजरा करणार गणेशोत्सव 

एमपीसी न्यूज – स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने पुढील वर्षी पुण्यातील सात गणपती मंडळे हे जम्मू काश्मीर येथील विविध जिल्ह्यात आपल्या बाप्पाच्या प्रतिकृतीसह किमान दीड दिवसाचा गणेशोत्सव साजरा करणार असल्याची माहिती पुनीत बालन ग्रुपचे अध्यक्ष व श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टचे उत्सवप्रमुख, विश्वस्त पुनीत बालन यांनी पत्रकार परिषदेत दिली.  

यावेळी कसबा गणपतीचे श्रीकांत शेटे, तांबडी जोगेश्वरीचे  केशव नेरूरगावकर, तुळशीबाग मंडळाचे विकास पवार, नितीन पंडीत, गुरुजी तालीम मंडळाचे प्रवीण परदेशी, केसरीवाडा गणपती मंडळाचे अनिल सकपाळ, अखिल मंडई मंडळाचे संजय मते, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टचे अध्यक्ष संजीव जावळे आदी उपस्थित होते.

सन 2019 साली केंद्र सरकारने जम्मू काश्मीर येथील कलम 370 रद्दबादल केले.या भागाचा विकास साधण्याच्या दृष्टीकोनातून केंद्र सरकारने विविध योजना लागू केल्या.ज्याप्रमाणे भौगोलिक विकास करण्यासाठी केंद्र सरकार पाऊले उचलत असताना पुण्याने देखील आपला संस्कृतिक वारसा येथील नागरिकांसाठी उपलब्ध व्हावा, या उद्देशाने उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

पुण्यातील गणेशोत्सव हा नेहमीच भारतातील नागरिकांसाठी एक पर्वणी असते.पुढील वर्षी पुण्यातील सात मंडळे आपल्या बाप्पाच्या प्रतिकृती काश्मीरमधील विविध जिल्ह्यात बसविण्यात येणार आहेत.येथील नागरिकांना समर्थन देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी कारवायांच्या विरोधात हा सांस्कृतिक महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. यामुळे येथील काश्मीरी पंडीत देखील बाप्पाच्या उत्सवात सहभागी होतील, असा विश्वास श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे उत्सवप्रमुख पुनीत बालन यांनी व्यक्त केला.

पुण्याच्या गणेशोत्सवाला समृद्ध वारसा लाभला आहे. कलम 370 हटविल्यानंतर जम्मू आणि काश्मीर येथील आर्थिक विकासाची घडी बसत असताना, महाराष्ट्राचा हा 130 वर्षांचा सांस्कृतिक ठेवा येथील नागरिकांना अनुभवता यावा यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत.अमरनाथ यात्रा, हर घर तिरंगा अशा उपक्रमांना येथील नागरिक प्रतिसाद देतात तर आपल्या बाप्पाला देखील निश्चित प्रतिसाद देतील असा विश्वास आहे असे, पुनीत बालन म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.