Pimpri News: “शाईफेक” प्रकरण पिंपरी-चिंचवडच्या लौकिकाला गालबोट! – महेश लांडगे यांची टीका

एमपीसी न्यूज : राज्याचे उच्च, तंत्र शिक्षणमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर भ्याड हल्ला करण्यात आला. संवैधानिक पदावर असलेल्या व्यक्तीवर अशाप्रकारे रसायनमिश्रित द्रव्य फेकणे पिंपरी-चिंचवडच्या सुसंस्कृत लौकिकाला गालबोट लावण्याचा प्रकार आहे. सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवृत्तीवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी टीका भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी केली.

राज्याचे मंत्री आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शनिवारी चिंचवडमध्ये शाई फेकून भ्याड हल्ला करण्यात आला. याच्या निषेधार्थ शहर भाजपाच्या वतीने रविवारी मोरवाडी येथे आंदोलन करण्यात आले.

यावेळी शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे, माजी महापौर उषा उर्फ माई ढोरे, राहुल जाधव, आमदार उमा खापरे, चिंचवड विधानसभा निवडणूक प्रभारी शंकर जगताप, नवनगर प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, प्रदेश सचिव अमित गोरखे, महिला शहराध्यक्ष उज्ज्वला गावडे, माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, संघटन सरचिटणीस अमोल थोरात, सरचिटणीस राजू दुर्गे, मोरेश्वर शेडगे, दक्षिण भारतीय आघाडीचे राजेश पिल्ले, माजी स्थायी समिती अध्यक्ष विलास मडीगेरी, भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष संकेत चोंधे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी, माजी नगरसेवक आणि मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते.

Chinchawad news: पिंपरी चिंचवड शहरात अचानक पाऊस आल्याने लोकांची धावपळ

आमदार लांडगे म्हणाले की, भारतीय राज्यघटनेनुसार देशातील प्रत्येक नागरिकाला निषेध नोंदवण्याचा अधिकार दिलेला आहे. एखादी गोष्ट आपल्या भावना दुखावणारी असेल, तर त्याचा निषेध सनदशीर मार्गाने नोंदवला पाहिजे. कर्नाटकातील एका काँग्रेस नेत्याने हिंदू धर्माबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. त्याचा निषेध भाजपाने सनदशीर मार्गाने केला होता. चंद्रकांत पाटील यांच्या बाबत घडलेला प्रकार हा भ्याड हल्ला होता. ही पिंपरी-चिंचवडची संस्कृती नाही. शहरामध्ये सर्व समाजाचे नागरिक गुण्यागोविंदाने राहतात. समाजातील सलोखा बिघडवण्याचा प्रकार काही लोक करीत आहेत, ही बाब सर्वच पक्षाच्या राजकीय नेत्यांनी लक्षात घेतली पाहिजे.

आमदार उमा खापरे म्हणाल्या की, चंद्रकांत पाटील यांच्या अंगावर शाई फेकण्याचा प्रकार घडला असून, त्याचा आम्ही जाहिर निषेध करतो. हा प्रकार अत्यंत निंदनीय असून, पाटील यांच्या विधानाचा चुकीचा अर्थ लावून, लोकांना भडकविण्याचे प्रकार घडवून आणणे, हे अत्यंत दुर्भाग्यपूर्ण आहे. या घटनेतील आरोपींची सखोल चौकशी होऊन, यात सहभागी लोकांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे, अशी मागणीही खापरे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.