Shapit Gandharva : शापित गंधर्व – भाग 48 – दुर्दैवाचे दशावतार संतोष आनंद

एमपीसी न्यूज : त्यांनी एक नाही, दोन नाही, अनेक – आजही कानाला (Shapit Gandharva) स्वर्गीय मैफलीचा आनंद देणारी गीते बनवून ठेवली आहेत. त्यांना एकदा नव्हे दोन-दोन वेळा फिल्मफेअरचे मानांकित पुरस्कार मिळालेले आहेत. कुठल्याही प्रकारचा घरातला कलेचा वारसा नसतानाही त्यांनी आपल्या जवळच्या नैसर्गिक आणि दैवी प्रतिभेच्या जोरावर या फिल्म इंडस्ट्री मधे स्वतःचं एक खास स्थान निर्माण केलं होतं. मानसन्मान, पैसा,प्रतिष्ठा, सर्व काही त्यांच्याजवळ होते. त्यांचे आयुष्य अतिशय सुंदर आहे, असे त्यांच्यासह सर्वांनाच वाटत होतं, अन् इथेच घात झाला. या सुंदर स्वप्नाचा बंगला असा कोसळला, की त्यांना बघून प्रत्येकाला त्यांच्याबद्दल हळहळ वाटू लागली.

मुहब्बत है क्या चीज….(फ़िल्म: प्रेम रोग)

एक प्यार का नगमा है।…. (फ़िल्म: शोर)

जिंदगी की ना टूटे लड़ी …. (फ़िल्म: क्रांती.)

मारा ठुमका, बदल गई चाल मितवा …. (फ़िल्म: क्रांती.)

मेघा रे, मेघा रे, मत परदेश जारे.. (फ़िल्म: प्यासा सवान)

मैं न भूलूंगा, इन रस्मों को, इन कसमों को (फ़िल्म: रोटी कपड़ा और मकान)

ओ रब्बा.. कोई तो बताए (फ़िल्म: संगीत)

आप चाहें तो हमको (फ़िल्म: संगीत )

जिनका घर हो अयोध्या जैसा (फ़िल्म: बड़े घर की बेटी)

दिल दीवाने का ढोला (फ़िल्म: तहलका)

जिंदगी की ना टूटे लड़ी( फ़िल्म: क्रांती.)

चना.. जोर गरम….(फ़िल्म: क्रांती.)

ये शान तिरंगा (फ़िल्म: तिरंगा)

पीले-पीले,ओ मोरे राजा… (फ़िल्म: तिरंगा)

मैंने तुमसे प्यार किया …(फ़िल्म: सूर्या)

असे एकापेक्षा एक, कर्णमधूर गीतांचे गीतकार- संतोष आनंद यांचे आजचे आयुष्य म्हणजे ‘परमेश्वराने त्यांना दिलेला भयंकर असा शाप’ आपल्याला जर वाटत असेल,तर त्यांना काय वाटत असेल….याची कल्पनाही न केलेली बरी.

5 मार्च 1940 रोजी तेलंगणा राज्यातल्या सिकंदराबाद येथे जन्माला आलेले संतोषजी आनंद पुन्हा एकदा चर्चेत आले ते, इंडियन आयडॉलच्या 12व्या पर्वातल्या एका एपिसोडमधे सामील झाल्यानंतर. .

आताच्या पिढीला जरी त्यांच्याबद्दल फारशी माहिती नसली तरीही, वर उल्लेखलेली गाणी त्यांची आहेत, इतके सांगितले तरी त्यांची ओळख मनाला सहज पटून जाईल. इतकी दैदिप्यमान कारकीर्द त्यांची होवून गेलेली आहे.एकापेक्षा एक अवीट गाण्याचे संगीतकार असलेले संतोषजी- जेव्हा व्हीलचेअरवर बसलेले दिसले, तेंव्हा त्यांना पाहून प्रत्येकाला दुःखच झाले.त्यातच जेव्हा कचकड्याच्या दुनियेत सतत वावरत असूनही अमाप माणुसकी जवळ घेवून चालत असलेल्या नेहा कक्करने त्यांच्याबद्दलची कर्मकहाणी विशद केली.

तेव्हा परमेश्वर एखाद्याबद्दल किती निष्ठूर होवू शकतो, याचीही खात्री असंख्य प्रेक्षकांना पटली. सिकंदराबाद येथे जन्मलेल्या संतोषजी आनंद यांना परमेश्वराने खास बनवूनच जन्माला घातले होते. अलीगढ विद्यापीठात त्यांना शिक्षण घेतानाच काव्य-लिखाण करण्याचा छंद जडला. सुप्रसिद्ध सिनेनिर्माता,दिग्दर्शक आणि अभिनेता मनोजकुमार यांच्या “पूरब और पश्चिम” या चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपटसृष्टीत गीतकार म्हणून पदार्पण केले.

पण, त्यांचे ‘शोर’ या चित्रपटातले ‘एक प्यार का नगमा है” हे 1972 साली प्रदर्शित झालेले गाणे (Shapit Gandharva) प्रचंड लोकप्रिय झाले.ते आजही तितकेच अवीट आहे.गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर आणि मुकेश यांचा मधूर आवाज आणि लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचे सुमधुर संगीत याला लाभले होते.यानंतर त्यांनी ‘रोटी, कपडा और मकान’ या चित्रपटातले ‘मैं ना भुलूंगा’ हे गाणे लिहले, ज्यासाठी त्यांना सर्वोत्तम गीतकाराचा पुरस्कार मिळाला, ज्याने त्यांच्या प्रतिभेवरही शिक्कामोर्तब केले.

खरे तर ही असली कलाकार मंडळी,यांनी कलेवर कितीतरी जास्त पटीने प्रेम केले.इतर कुठल्याही गोष्टीपेक्षाही-अगदी पैसे सुद्धा यांनी दुय्यम मानले. कलेतून मिळणारा मान यांना पैशापेक्षा कितीतरी जास्त मौल्यवान होता. संतोषजीही याला अपवाद नव्हते. त्यांनी अनेक संगीतकारासोबत काम केले.पण त्यांची नाळ जुळली ती ‘मनोजकुमार’ सोबत.

त्यानंतर त्यांना राज कपूर यांनीही आपल्या बऱ्याचशा चित्रपटात गीतकार म्हणून संधी दिली.त्यांनी लिहलेली गीते आजही मनाला खूप आंनद देतात आणि जगाची रीतही पटवून देतात. चित्रपटसृष्टीचा एक अलिखित अन् तितकाच निष्ठुर असा नियम आहे तो म्हणजे- तुम्ही सतत काम करत राहिले पाहिजे,अन चर्चेतही राहिले पाहिजे.

Mp Shrirang Barne: अखेर निगडीपर्यंत मेट्रो धावण्याचा मार्ग मोकळा

संतोषजी हे अस्सल कलाकार होते. त्यांना असल्या गोष्टी जमल्या नाहीत,त्यातच त्यांना काम मिळणे हळूहळू कमी होत चालले. अन यात भर म्हणजे त्यांचा मोठा अपघात झाला.खरं तर तो जीवघेणाच होता. पण केवळ दैव बलवत्तर म्हणून ते वाचले.पण त्याहूनही दुःखद म्हणजे- या अपघातात त्यांचे पाय गेले.त्यांना अपंगत्व आले.आणि त्याचसोबत फिरले नशिबाचे चक्र.हे कमी की काय, असे वाटावे अशी आणखी एक पण महाभयंकर अशी घटना त्यांच्या आयुष्यात घडली.

त्यांच्या लग्नानंतर दहा वर्षांनंतर नवसा-सायासाने झालेल्या त्यांच्या एकुलत्या एका मुलाने म्हणजेच संकल्पने स्वतःच्या पत्नीसह आत्महत्या केली.यात केवळ नशिबाने त्याची छोटी मुलगी वाचली, जिचे अगदी न कळत्या वयातच मायबापाचे छत्र हरवले.इतर कुठल्याही धक्क्यापेक्षा या धक्क्याने संतोषजी पूर्णपणे कोलमडून गेले.त्यांचा परमेश्वरावरचा (Shapit Gandharva) विश्वास उडाला,जगण्याची इच्छाही मेली.पण त्यांना जगणे भाग होते, कारण त्यांच्या मुलाने जाताजाता या वयस्कर, दुर्बल आणि हताश बापाच्या हाती आपले लेकरू सोपवले होते. परमेश्वरा किती रे निष्ठूर होतोस तू असे आपल्याला जर हे वाचून वाटत असेल तर विचार करा, संतोषजी यांची अवस्था काय असेल?

बरं त्यांचा मुलगा कोणी ऐरा गैरा किंवा अनाडी नव्हता.तो गृह मंत्रालयात मोठ्या हुद्द्यावर होता.तो आयएएस वर्गाच्या ऑफिसर्सला सामाजिकशास्त्र आणि गुन्हेगारीशास्त्र शिकवत होता. तो तिथल्या ओंगळ आणि भोंगळ कारभारामुळे खूप परेशान होता.त्याने दहा पाणी सुसाईड नोट लिहून ठेवली होती, ज्यात तिथल्या भ्रष्ट कारभाराच्या अनेक घटना लिहल्या होत्या.

आपल्या देशात अशा आरोपांनी कधीही कोणाला शिक्षा झाली नाही, या घटनेनेही तसेच घडले. संकल्पच्या आत्महत्ये नंतर चर्चा झाली,तपास करण्याचा फार्स झाला, अन् काही दिवसातच ती फाईलही बंद झाली.या घटनेने संतोषजी पूर्णपणे खचले. त्यातच त्यांच्या सोबत जगरहाटी निभावणारे असल्याने कोणीही नव्हते. संतोषजी याने पूर्णपणे निराश झाले, पण अखेर इंडियन आयडॉलच्या एका भागात त्यांनी आपली ही भळभळती जखम जगापुढे उघडी केली.

माणुसकीशून्य या जगात त्यांच्या या दुःखाने क्षणभर अनेक जण हळहळले,कोणी खोटे मगरीचे अश्रूही ढाळले,एकट्या नेहा कक्करने मात्र त्यांना नातीचा दाखला देत पाच लाख रूपये दिले,जे घ्यायला त्यांचा स्वाभिमान आडवा आला,पण भावनिक नेहाने त्यांना कसेबसे हे पैसे घ्यायला भाग पाडले. आताही ते आपल्या उतारवयात असंख्य अडचणीला आणि आजाराला तोंड देत-आपले उर्वरित दुःखद आयुष्य रेटत आहेत. त्यांचे हे भोग लवकरच संपोत आणि संतोषजी यांच्या उर्वरित जीवनात आता तरी निखळ आनंद निर्माण होवो,इतकीच त्या जगदीशाकडे प्रार्थना..!

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.