Shapit Gandharva : शापित गंधर्व – लेख -11 – अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन

एमपीसी न्यूज (विवेक कुलकर्णी) : चेहऱ्यावर अतिशय गोड अशी निरागसता, कमालीचे आरसपानी सौंदर्य, चांगली अभिनयक्षमता, पदार्पणातच बॉक्स ऑफिसवर विक्रम नोंदवणारा यशस्वी चित्रपट. सारे काही तिच्या नशिबात होते. ती एका शालीन अन शाही घराण्यात जन्माला आली होती. तिने कितीही मोठ्या बजेटचा चित्रपट काढायचा ठरवले असते, तरीही तिला ते सहजच शक्य होते. तिने मात्र त्यानंतर आलेल्या अनेक मोठमोठ्या बॅनर्सचे चित्रपट धुडकावून हिमालयासोबत राहण्याचा मार्ग स्वीकारला की हट्ट धरला अन केवळ या एका हट्टापायी तिच्याकडे सर्व काही असूनही तिची ओळख चित्रपटसृष्टीत मग केवळ एका सुपरडूपर चित्रपटात झळकलेली अभिनेत्री (Shapit Gandharva) म्हणूनच राहिली.

कधी नशीब,कधी संधी, कधी हट्ट तर कधी चूक एखाद्याच्या करीयरच्या आडवी येते. तिने तर चित्रपटाच्या आलेल्या अनेक चांगल्या ऑफर्स लाथाडून ‘मला कामच करायचे नाही आणि करणारच असेल तर ते फक्त माझ्या नवऱ्यासोबतच’ असा हट्ट धरला. या दोन चुकीच्या गोष्टींचा तिच्या उज्ज्वल भविष्यात फार मोठा अडथळा ठरला आणि हिंदी चित्रपटसृष्टीवर राज्य करू शकेल, अशी मराठी अभिनेत्री सर्व काही असूनही तसे करण्यात यशस्वी ठरली नाही. फक्त तिच्या बाबतीत एकच घडले की एकही चित्रपट हातात नसूनही आजही ती सदैव चर्चेत असते. त्यासाठी तिला ना कसले भलते सलते फोटोसेशन करावे लागत ना तिला कसला स्टंट करावा लागत. केवळ तिचे निर्मळ आणि कोणालाही सहज जिंकणारे निरागस हास्यच आजही पुरेसे असते.

होय! श्रीमंत भाग्यश्रीराजे विजयसिंह राजे पटवर्धन उर्फ भाग्यश्री उर्फ ‘मैंने प्यार किया’ची लाडकी ‘सुमनजी’ ही मिरज (सांगलीचे )सुप्रसिद्ध संस्थानिक श्रीमंत विजयसिंह राजे यांच्या घरी जन्मली. 23 फेब्रुवारी 1969 रोजी जन्माला आलेल्या भाग्यश्रीला अगदीच शापित गंधर्व (Shapit Gandharva) असे म्हणता येत नाही, तरी तिची एकंदरीतच कारकीर्द नक्कीच एका शापित गंधर्वासारखी राहिलेली आहे .

सांगलीचे पटवर्धन घराणे आजही श्रीमंत पटवर्धन म्हणूनच ओळखले जाते. अशा शाही घरात ती जन्माला आली. तिला आणखी दोन बहिणी आहेत. राजघराण्यातील कडक शिस्त,सरंजामशाही असे असूनही केवळ मुलगी म्हणून तिला दुय्यम वागणूक मिळाली नाही. तिला ते सर्व मिळाले,जे एका राजघराण्यातील अपत्याला मिळायला हवे होते. जगातील कोणत्याही सुखाला काही क्षणातच ओंजळीत बद्ध करण्याची ताकत तिला जन्मजात लाभली होती. मात्र का कुणास ठाऊक वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी तिला मायावीनगरीची ओढ लागली अन त्याहूनही मोठी बाब म्हणजे चक्क राजश्री प्रॉडक्शनचा चित्रपट तिला पदार्पणातच मिळाला. त्याआधी दूरदर्शनवरही ती ज्येष्ठ अभिनेता अमोल पालेकर यांच्या ‘कच्ची धूप’ नावाच्या मालिकेतही झळकली होती. मात्र 1989 साली आलेल्या ‘मैंने प्यार किया’ या चित्रपटाने प्रदर्शित होताच एकच लोकप्रियता मिळवली आणि भाग्यश्री हे नाव सर्वत्र चर्चेत आले. तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पदार्पणातला मानाचा पुरस्कारही याच चित्रपटामुळे मिळाला.

निरागस प्रेमकथा. प्रेम- सुमनचे प्रेम म्हणजे जणू प्रत्येक नवथर तरुण- तरुणीच्या मनातलीच भावना! सोबत राम-लक्ष्मणचे अवीट संगीत, एस. पी. बालसुब्रमण्यम आणि लताबाईंच्या आवाजातली एकाहून एक अप्रतिम गीते, ‘दोस्ती में नो सॉरी नो थँक्स’ हा गाजलेला डायलॉग, असे यशस्वी चित्रपटासाठी लागणारे सर्व समीकरण जुळून आले आणि मैंने प्यार कियाने यशस्वीतेचे सर्व उच्चांक गाठत आपले नाव हिंदी सिनेसृष्टीच्या इतिहासात अजरामर केले. हाच चित्रपट तिचा सह-कलाकार असलेल्या सलमानसाठी पुढील सोनेरी कारकिर्दीचा पाया ठरला. यानंतर तो एकेक सुपरहिट चित्रपट देत गेला आणि बघता-बघता चित्रपटसृष्टीचा सुपरस्टारही झाला. त्याच वेळी भाग्यश्री मात्र आपल्यापेक्षा वयाने 10 वर्षाहून अधिक मोठ्या असलेल्या परजातीतल्या हिमालय दासानी नावाच्या कोणा तरी व्यावसायिकाबरोबर घरच्यांचा विरोध पत्करून, विवाह करून आपल्या करियरच्या यशात स्वतःहून अडथळा घालून बसली, अशी चर्चा हळूहळू बाहेर येत गेली. लग्न केल्यानंतर ती अनेक वर्षे प्रसिद्धी माध्यमांपासून दूर राहिली. कधीतरी तिच्याबद्दल काही चर्चा कानावर यायची; पण ती स्वतः कुठल्याही वृत्तपत्र वा सिनेमाध्यमाशी बोलली नाही.

मात्र काहीच दिवसात तिच्या चाहत्यांना तिच्या पुनरागमनाची गोड बातमी मिळाली. तिने तिच्या अटींवर चित्रपटात काम मिळवले. तिला चित्रपटात काम करण्यासाठी नायक म्हणून दुसरा कोणीही चालणार नव्हता. तिला तिच्याच खऱ्याखुऱ्या आयुष्यातला नायक रूपेरी पडद्यावर हवा असा तिचा हट्ट होता. भले तो इतरांना विचित्र वाटला असेलही. पण राजघराण्यातील राजकन्याच ती. तिला दुसऱ्याचे ऐकायची सवय होतीच कुठे? ‘कैद में है बुलबुल’ या नावाचा चित्रपट आला खरा; पण ज्या प्रेक्षकांनी तिच्या ‘मैंने प्यार किया’ वर भरभरून प्रेम केले, त्याच प्रेक्षकांना ती कैदखान्यातली बुलबुल काही भावली नाही ती नाहीच. त्यानंतरही अनेक चांगल्या निर्मात्या, दिग्दर्शकांनी तिला समजून सांगितले; पण तिने हट्ट सोडला नाही. त्यानंतर अनेक नवनवीन सुंदर,अभिनयाची उत्तम जाण असलेल्या नायिका येत गेल्या आणि आपल्या हट्टावर त्यानंतरही ठाम असलेल्या भाग्यश्रीकडे मग कोणाचेही लक्ष गेले नाही. कधी एखाद्या फिल्मी पार्टीत, कधी एखाद्या विमानतळावर तिची कुणीतरी टिपलेली छबी कुठल्यातरी सिनेमासिकात दिसायची; अन् दर्दी प्रेक्षक तिच्या अकाली संपलेल्या करीयरमुळे हळहळ (Shapit Gandharva) व्यक्त करायचे. पण ती मात्र कशाचेही दुःख करत बसली नाही. जगाचा, घरच्यांचा विरोध पत्करून स्वीकारलेल्या आपल्या संसारात ती आनंदी होती. म्हणूनच तिचे तेच आरसपानी सौंदर्य आजही तसेच टिकून राहिले आहे.

तिने काही प्रादेशिक चित्रपटही केले; पण त्यातही तिला फारसे यश मिळाले नाही. अधून-मधून ती कुठल्यातरी टी.वी. चॅनेलवर दिसते. ती दिसली की आजही ‘मैंने प्यार किया’ची सुमन डोळ्यापुढे येते आणि सौंदर्य, अभिनयाची उत्तम जाण असे सर्व काही असूनही तिची मोठी होऊ शकली असती अशी कारकीर्द मध्येच खुंटली, याची हळहळ मनाला सलत राहते. आता तिचा मुलगा हिंदी चित्रपटसृष्टीच्या रजत पटलावर नायक म्हणून ‘मर्द को दर्द नहीं होता’ या नावाच्या चित्रपटातून झळकला आहे. तिची लेक अवंतिका आईसारखीच सौंदर्याची खाण आहे. हिंदी सिनेसृष्टीवर नेहमीच दाक्षिणात्य अभिनेत्रींनी अधिराज्य गाजवले असे म्हटले जाते. मात्र मराठी नायिका सुद्धा यात कमी नव्हत्या. महान अभिनेत्री नूतन यांनीही एक मोठा काळ गाजवला होता. त्यांची बहीण तनुजा, नंतर माधुरी दीक्षित हे आणखी एक मोठे नाव. उर्मिला,काजल याही आपल्या नावाचा ठसा उमटवत लोकप्रिय झाल्या. पण एकच चित्रपट गाजूनही भाग्यश्री पटवर्धनची जादू आजही तशीच कायम आहे. दुःख हेच आहे की तिच्याकडून खूप अपेक्षा असताना ती मात्र त्या पूर्ण करू शकली नाही. नक्की हा कुठला शाप असावा?
1989 च्या काळातल्या या स्वप्नवत यश मिळवून अजरामर ठरलेल्या खऱ्याखुऱ्या राजकन्येला तिच्या पुढील आयुष्यासाठी मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा!

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.