Chakan : अवैध प्रवासी वाहतुकीच्या विरोधात शिवसेनेचे खळ्ळखट्याक…

अवैध प्रवासी वाहतूक करणारी अनेक वाहने फोडली

एमपीसी न्यूज- अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे पुणे- नाशिक महामार्गावरील भोसरी ते चाकण दरम्यान वाहतूक कोंडी काही केल्या कमी होत नाही. पोलिसांकडूनही अशा वाहनांवर कारवाई होताना दिसत नाही. अखेर आज, रविवारी (दि.26) रात्री साडेआठच्या सुमारास शिवसेनेने खळ्ळ खट्याक… आंदोलन करीत वाहतुकीला अडथळा ठरणारी अनेक अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहने फोडली.

पुणे नाशिक महामार्गावर येथील तळेगाव चौकात, आबेठाण चौकात आमदार सुरेश गोरे यांच्या उपस्थितीत करण्यात आलेल्या या आंदोलनामुळे अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांनी वाहनांसह चौकांमधून पोबारा केला.

आमदार सुरेश गोरे यांनी पोलिसांना सोबत घेऊन रस्त्यावरील वाहतुकीचे सर्वेक्षण करताना अवैध प्रवाशी वाहतूक बंद करण्याच्या सूचना केल्या होत्या. चाकण नगरपरिषदेने अवैध वाहतूक चाकण परिसरात बंद करण्याचा ठराव केला होता. मात्र अवैध प्रवाशी वाहतुकीच्या वाहनांवर कारवाई सुरु असल्याचा दावा पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत होता.

प्रत्यक्षात पोलिसांनी ही वाहने रस्त्यावरून बंद केली नव्हती. त्यामुळे मागील काही दिवसांपासून वाहतुकीचा फज्जा उडाला होता. त्यामुळे चिडलेल्या शिवसैनिकांनी आज, रविवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास चौकात वाहतुकीला अडथळा ठरणारी वीस ते पंचवीस अवैध प्रवासी वाहने फोडून टाकली. यावेळी आमदार सुरेश गोरे यांच्यासह सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

अशी आहे पार्श्वभूमी:

चाकणमध्ये झालेल्या हिंसाचारात शहरात चाकण ते भोसरी, चाकण ते राजगुरुनगर, चाकण ते तळेगाव दरम्यान अवैध प्रवाशी वाहने चालविणाऱ्या अन्य जिल्ह्यातील वाहन चालकांचा समावेश असल्याचा संशय मागील काही दिवसांपासून व्यक्त होत आहे. त्यातच मागील महिनाभरापासून या परिसरात होणारी वाहतूक कोंडी काही केल्या कमी होत नसल्याने हेच वाहन चालक जाणीवपूर्वक उत्तर पुणे जिल्ह्यात विशेषतः चाकण भागात वाहतूक कोंडी होण्यासाठी वाहने रस्त्यात आडवीतिडवी उभी करत असल्याचा संशय सामान्य नागरिकांनी व्यक्त केला होता. यापूर्वी आठवड्यात एखाद्या दुसऱ्या दिवशी झालेली कोंडी पुढे सुरळीत होत होती. मात्र मागील महिनाभरापासून सलग दररोज अहोरात्र याच चालकांनी ठरवून वाहतूक कोंडी केल्याचा संशय नागरिक आणि कार्यकर्त्यांना होता. त्याचेच प्रत्यंतर रविवारी रात्री अवैध प्रवासी वाहतुकीची वाहने फोडण्यात झाल्याचे मानले जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.