Chakan : सामाजिक कार्यकर्ते डॉ. अविनाश अरगडे यांचा जाहीर नागरी सत्कार

एमपीसी न्यूज – ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अविनाश आरगडे यांच्या नागरी सत्कार व त्यांच्या साडेचार दशकांच्या कारकीर्दीवरील ‘चक्रयोगी’ या गौरव ग्रंथाचे यावेळी प्रकाशन करण्यात आले. वैद्यकीय व्यवसाय, चाकण (Chakan)  स्पोर्ट्स असोसिएशन, डॉक्टर असोसिएशन, चाकण शिक्षण मंडळ, कला व वाणिज्य महाविद्यालय, रोटरी क्लब, पाणी प्रश्न चळवळ, अभिजात ललित कला मंच, नवोन्मेष विद्यामंदिर, ग्रामीण विज्ञान परिषद, इंग्लिश अकादमी, शेठ धनराज सांकला व्याख्यानमाला आदी संस्थांच्या माध्यमातून डॉ. अरगडे यांनी गेल्या 46 वर्षात भरीव योगदान दिले आहे. त्यानिमित्त त्यांचा जाहीर नागरी सत्कार करण्यात आला.

Pune : दुरुस्तीसाठी पुण्यातील कैलास स्मशान भूमीतील विद्युत दाहिनी गुरुवारी राहणार बंद

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार दिलीप मोहिते पाटील होते. संत साहित्याचे अभ्यासक, माजी संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, राज्याच्या नियोजन मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. रत्नाकर महाजन, माजी आमदार डॉ. राम कांडगे, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सुरेखाताई मोहिते, डॉ. आरगडे यांच्या पत्नी आसावरी, पुत्र डॉ. असीत आरगडे, स्नुषा सुप्रिया अरगडे, काँग्रेस अल्पसंख्याक आघाडीचे जमीर काझी, माजी उपनगराध्यक्ष ऍड. प्रकाश गोरे, भारतीय जनता पक्षाचे कालिदास वाडेकर, शिवसेनेचे रामदास धनवटे, चाकण शिक्षण मंडळाचे संस्थापक विश्वस्त मोती काका सांकला, माजी प्राचार्य राजू दीक्षित आदी उपस्थित होते.

यावेळी डॉ. मोरे म्हणाले की,  चाकणच्या (Chakan)  ऐतिहासिक भूमीत स्थिरावत गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आयुष्य खर्ची घालताना डॉ. अविनाश अरगडे यांनी लोकांच्या मनात घर केले. वैद्यकीय सेवेसह शिक्षण, क्रीडा, पाणी, पर्यावरण, सांस्कृतिक, साहित्यिक क्षेत्रातील त्यांच्या अष्टपैलू कार्याने चाकणवासीयांना समृद्ध केले. संस्थात्मक कार्यातून त्यांनी आदर्श समाजाचे चित्र रंगवत समाजमन व पिढी घडवण्याचे काम केले.

हा सोहळा भावनिक क्षण असल्याचे सांगत डॉ. अरगडे म्हणाले, “या प्रवासात अनेक चढउतार आले. परंतु, पत्नी आसावरीची खंबीर साथ आणि दृढनिश्चयाने केलेल्या कामाने यश आले. बालपण कष्टात गेले; पण वडिलांचे संस्कार मोलाचे ठरले. स्वाभिमानी जगण्याची सवय त्यांनी लावली. कुठेही न झुकता, लालसेला बळी न पडता हाती घेतलेले काम नेटाने पुढे नेले. सामाजिक कामासाठी वेळ द्यावा लागतो, हे नव्या पिढीने लक्षात घ्यावे.”

सूत्रसंचालन सूर्यकांत मुंगसे यांनी केले. राजू दीक्षित यांनी प्रास्ताविक केले. कालिदास वाडेकर यांनी आभार मानले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.