SSC Exam Form : दहावीच्या 2021 मध्ये होणाऱ्या परिक्षेसाठी बुधवारपासून अर्ज करता येणार

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 2021मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेसाठी बुधवारपासून (दि.23) ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.

यामध्ये नियमित, पुनर्परीक्षार्थी, यापूर्वी नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी, तसेच श्रेणी सुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे.

दहावीची परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन पद्धतीने आवेदनपत्र भरता येणार आहे.

दहावीच्या परीक्षेसाठी नियमित विद्यार्थ्यांना 23 डिसेंबर 2020 ते 11 जानेवारी 2021पर्यंत, तर पुनर्परीक्षार्थी, खासगी विद्यार्थी, श्रेणी सुधार व तुरळक विषय घेऊन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना 12 ते 25 जानेवारी 2021 दरम्यान अर्ज करता येणार आहे.

दहावीच्या परीक्षेसाठी आवेदनपत्रे ही ऑनलाइन पद्धतीने स्वीकारण्यात येणार आहेत. तसेच विद्यार्थ्यांनी ही आवेदनपत्रे त्यांच्या माध्यमिक शाळांमार्फत भरावीत, असे आवाहन राज्य मंडळाने केले आहे.

दरम्यान, फॉर्म नंबर 17 द्वारे नोंदणी करणाऱ्या खासगी विद्यार्थ्यांची 2021मधील परीक्षेची आवेदनपत्रे भरण्याचा कालावधी स्वतंत्रपणे निश्चित केला जाणार असल्याचे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.