Mumbai : पिंपरी ते निगडी मेट्रो मार्गाला राज्य शासनाची मंजुरी

एमपीसी न्यूज – पुणे मेट्रो पहिल्या टप्प्यात निगडी पर्यंत पोहोचण्यासाठी राज्य शासनाने देखील मंजुरी दिली आहे. महाराष्ट्र मेट्रो कडून सविस्तर प्रकल्प अहवाल सादर केल्यानंतर डिसेंबर 2018 मध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेने मंजुरी दिली. त्यानंतर हा अहवाल राज्य शासनाच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता. त्याला आज (बुधवारी) राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे पुणे मेट्रो पहिल्या टप्प्यात निगडी पर्यंत पोहोचण्याचा आणखी एक मार्ग मोकळा झाला असून आता केवळ केंद्र सरकारच्या परवानगीची गरज आहे.

पुणे-पिंपरी चिंचवडचा महाराष्ट्रातील मोठ्या नागरी समुहात समावेश होतो. विविध उद्योग आणि शैक्षणिक संस्थांमधील वाढीमुळे गेल्या दोन दशकात शहरात लोकसंख्या आणि रोजगारामध्ये प्रचंड वाढ झाली आहे. गेल्या काही दशकात पिंपरी चिंचवड परिसरात शहरीकरण वेगाने वाढत आहे. 2011 च्या जनगणनेनुसार पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या 17.27 लाख होती. ती 2017 पर्यंत 21 लाख झाली असून 2028 आणि 2038 या वर्षातील लोकसंख्या अनुक्रमे 30.9 लाख आणि 39.1 लाख होण्याचा अंदाज आहे.

सध्या महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड कॉरिडोर एक म्हणजेच पीसीएमसी ते स्वारगेट (16.598 किमी) मेट्रो मार्गिकेचे बांधकाम करीत आहे. त्यापैकी पीसीएमसी पासून रेंजहिल पर्यंत डिसेंबर 2019 पर्यंत मेट्रो कार्यान्वित करण्यात येणार असून रेंजहिल ते स्वारगेट नोव्हेंबर 2021 पर्यंत कार्यान्वित करण्याचा मानस आहे. पीसीएमसी ते निगडी या मार्गाच्या विस्तारासाठी सर्वसामान्य नागरीक, शहरातील सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधी, तसेच इतर भागधारांकडून मागण्या करण्यात आल्या होत्या.

महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ . ब्रिजेश दीक्षित म्हणाले, पीसीएमसी ते निगडी या विस्तारीत मेट्रो मार्गाची नितांत  गरज आहे. यामुळे निगडी (भक्ती शक्ती चौक) थेट स्वारगेट, मंडई, फडके हौद, शिवाजी नगर, सिविल कोर्ट या भागांशी जोडला जाईल. मेट्रोची पूर्व – पश्चिम मार्गिका जी पीसीएमसी ते स्वारगेट अशी बनविण्यात येत आहे, आता या विस्तारामुळे पुणे पिंपरी चिंचवड महानगरच्या पश्चिमेकडील दाट वस्ती असलेल्या सर्व भागांना जोडण्याचे काम होईल.

महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, “पुणे मेट्रो पहिल्या टप्प्यात निगडी पर्यंत जाणार असल्यामुळे पिंपरी चिंचवड परिसरातील सर्व दाट लोकवस्ती असलेले भाग मेट्रोने जोडले जातील. या विस्तारामुळे एक प्रभावी शहरी वाहतूक व्यवस्था निगडी, पिंपरी चिंचवड करांना मिळणार आहे. यामुळे या भागातील वाहतूक सुरळीत होण्यासाठी मदत होणार आहे. या बरोबरच पीसीएमसी ते स्वारगेट या मेट्रो मार्गिकेची प्रवासी वाहतूक देखील वाढणार आहे.”

पिंपरी ते निगडी मेट्रो मार्ग –
# लांबी – 4.413
# स्थानके – तीन (चिंचवड, आकुर्डी, निगडी)
# खर्च – 1 हजार 48.22 कोटी रुपये

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.