Pune Crime News : पोलीस चौकीतच पोलीस उपनिरीक्षकाची गचांडी पकडून मारहाण; 21 वर्षीय तरुण अटकेत

एमपीसी न्यूज : सतत हॉर्न वाजवत भरधाव वेगात कार चालवणाऱ्या तरुणाला वाहतूक पोलिसांनी पकडून पोलीस चौकीत आणले असता या तरुणाने पोलीस चौकीत धिंगाणा घालत पोलीस उपनिरीक्षकाची गचांडी पकडून त्यांना हाताने मारहाण केली. कात्रज पोलीस चौकीत शनिवारी हा प्रकार घडला. 

याप्रकरणी कारचालक हर्षल बापूराव रोहिले (वय 21, लेन नं 3, शरदनगर चिखली पुणे) असे अटक करण्यात आलेल्या कार चालकाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिस शिपाई गणेश नरोटे यांनी तक्रार दिली आहेत. भारती विद्यापीठ पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गणेश नरुटे हे वाहतूक विभागात नेमणुकीस आहेत. कात्रज चौकात ते कर्तव्यावर असताना आरोपी सतत हॉर्न वाजवत भरधाव वेगात गाडी चालवत होता. त्यामुळे फिर्यादीने गाडी अडवण्याचा प्रयत्न केला असता आरोपी गाडी न थांबता पुढे निघून गेला. त्यानंतर फिर्यादीने इतर सहकाऱ्यांच्या मदतीने गाडी थांबवून हर्षल रोहिले याच्याकडे लायसन व कागदपत्रांची मागणी केली. परंतु ज्याने तुम्हाला माझ्यावर कारवाई करण्याचा अधिकार नाही असे सांगून कागदपत्र दाखवण्यास नकार दिला. यावेळी आरोपीने कात्रज चौकात धिंगाणा घातला. “मी तुम्हाला बघून घेईल, तुझी नोकरी घालवतो, तू मला ओळखत नाहीस” असे बोलून वाहतूक पोलिसांच्या अंगावर धावून गेला.

या सर्व प्रकारानंतर आरोपी कारचालक यांना पोलिसांनी कात्रज पोलिस चौकीत नेले असता आरोपीने त्या ठिकाणी गोंधळ घातला. चौकीतील खुर्च्यांची फेकाफेक करून सरकारी वर्दी वर असलेले पोलीस उपनिरीक्षक गौरव देव यांची गचांडी पकडून त्यांना हाताने मारहाण केली आणि शिवीगाळ केली. या सर्व प्रकारानंतर आरोपीवर सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. भारती विद्यापीठ पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.