Pimpri : महिनाभर विषय तहकूब, परत मंजूर, पुन्हा रद्द अन्‌ रद्द झालेला विषय ‘जीबी’समोर! 

भाजपचे सभाशास्त्र; शहर सुधारणा समितीचा उरफाटा कारभार

सभेच्या एक दिवस अगोदर गटनेत्यांसाठी उद्या सादरीकरण 

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपने सभाशास्त्राची ‘ऐसी की तैसी’ केली आहे. शहर सुधारण समितीने वीज बचतीसाठी शहरात ‘एलईडी दिवे’ बसविण्याचा विषयाच्या तहकूब अन्‌ मंजुरीचा खेळ मांडला आहे. पहिल्यांदा एक महिने विषय तहकूब ठेवला. त्यानंतर बहुमताच्या जोरावर मंजूर केला अन्‌ मंजूर केलेला विषय अचानक रद्द करत फेर सादर करण्याचा निर्णय घेतला. तत्पूर्वी, शहर समितीने मंजूर केल्याने हा विषय अंतिम मान्यतेसाठी महासभेसमोर आला आहे. त्यामुळे महासभेसमोर तहकूब केलेला विषय आला असून महासभेच्या एक दिवस अगोदर म्हणजेच उद्या (मंगळवारी) या विषयाचे गटनेत्यांसाठी सादरीकरण ठेवले आहे. दरम्यान, हा विषय राज्य सरकारमार्फत आला असल्याने ‘एम’ व्हिटामिन मिळणार नसल्यानेच सत्ताधा-यांनी हा खेळ मांडला असल्याची, जोरदार चर्चा पालिका वर्तुळात रंगली आहे. 

उर्जासंवर्धनाच्या दृष्टीकोनातून जुने सोडियम व्हेपर, मेटल हालाईड हे पारंपारिक दिवे काढून एलईडी दिवे बसविण्याचे काम महापालिकेने सन 2012-13 पासून सुरु केले आहे. हालईड दिव्या ऐवजी रस्त्याच्या प्रकारानुसार आवश्यक प्रकाश प्रमाण राखण्याकरिता एलईडी दिवे बसविण्यात येत आहेत. यासाठी राज्य सरकारने ईईएसएल सोबत करारनामा केला आहे. महापालिका हद्दीत एकूण 74 हजार 889 दिव्यांची संख्या आहे. त्यापैकी 38 हजार 755 एलईडी दिवे बसविले असून 36 हजार 134 दिवे बसविण्यात येणार आहेत. त्यासाठी 27.39 कोटी रुपये खर्च येणार आहे. या दिव्यांची वॉरंटी सात वर्ष असून एलईडी दिव्यांची देखभाल व दुरुस्ती काम ईईएसएल मार्फतच करण्यात येणार आहे. दरम्यान, पायाभूत खर्च महापालिकेला करावा लागणार आहे.

सविस्तर माहितीसह आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी हा प्रस्ताव 16 जुलै 2018 रोजी शहर सुधारणा समितीसमोर मान्यतेसाठी ठेवला. 24 जुलै रोजी झालेल्या समितीच्या पाक्षिक सभेसमोर हा विषय मंजुरीसाठी आला होता. मात्र, सत्ताधा-यांनी कोणतेही सबळ कारण न देता हा विषय तहकूब केला. त्यानंतर 14 ऑगस्ट 2018 रोजी झालेल्या सभेत देखील हा विषय पुन्हा तहकूब ठेवला. त्यानंतर 28 ऑगस्ट 2018 रोजीच्या शहर सुधारणा समितीच्या पाक्षिक सभेत हा विषय बहुमताच्या जोरावर मंजूर करण्यात आला. चार अनुकूल तर दोन प्रतिकूल मते पडली होती.

शहर सुधारणा समितीने विषय मंजूर केल्याने अंतिम मान्यतेसाठी हा विषय सप्टेंबर महिन्याच्या महासभेसमोर आला. पंरतु, शहर सुधारणा समितीने पुन्हा मंजूर केलेला विषय अचानक 11 सप्टेंबर 2018 रोजी झालेला सभेत सदस्य प्रस्तावाद्वारे रद्द केला आणि फेर सादर करण्याचा निर्णय घेतला. शहर सुधारणा समितीने अचानक रद्द केल्यामुळे महासभेसमोर तहकूब झालेला विषय मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे. त्यातच पुन्हा महासभेच्या एक दिवस अगोदर म्हणजेच उद्या (मंगळवारी)  या विषयाचे गटनेत्यांसाठी सादरीकरण ठेवले आहे. यामध्ये सत्ताधा-यांनी सभाशास्त्राचा सर्व नियम धाब्यावर बसविले आहेत.

हा विषय राज्य सरकारमार्फत आला असल्याने पदाधिका-यांना ‘एम’ व्हिटामीन मिळणार नाही. त्यामुळेच सत्ताधा-यांनी हा विषय तहकूब अन्‌ मंजुरीचा खेळ मांडला असल्याची, जोरदार चर्चा पालिका वर्तुळात रंगली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.