Pune : ‘पुणे मेट्रो निगडीपर्यंत नेण्याचे काम ‘केंद्र सरकारच्या 100 दिन कार्यक्रमाअंतर्गत हाती घ्या’

खासदार श्रीरंग बारणे यांची केंद्रीय शहरी विकास मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्याकडे मागणी 

एमपीसी न्यूज – पुणे मेट्रो पहिल्याच टप्यात निगडीपर्यंत नेण्याबाबतचा सविस्तर प्रकल्प अहवाल पिंपरी-चिंचवड महापालिका, राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पाठविला आहे. त्याला मान्यता देण्यात यावी. ‘एनडीए’च्या दुस-या सरकारच्या ‘100 दिन कार्यक्रमाअंतर्गत निगडी मेट्रोचे काम हाती घेण्यात यावे, अशी मागणी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. 
खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्रीय शहरी विकास मंत्री हरदीप सिंग पुरी यांना निवेदन दिले आहे. त्यात बारणे यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्रात पिंपरी-चिंचवड शहराची औद्योगिकनगरी म्हणून ओळख आहे. शहर सर्वांत वेगाने वाढत आहे. विविध उद्योग, नामांकित शैक्षणिक संस्था शहरात आहेत. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून शहराची लोकसंख्या मोठ्या संख्येने वाढत आहे. शहरीकरणात वेगाने वाढ झाली आहे. 2011 च्या जनगनणेनुसार पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या 17.27 लाख होती. आजमितीला शहराची लोकसंख्या 21 लाखाच्या आसपास आहे. सन 2028 पर्यंत 30.9 लाख आणि सन 2038 पर्यंत शहराची लोकसंख्या 39.1 लाखापर्यंत पोहचेल.

पुणे मेट्रो पहिल्याटप्यात केवळ पिंपरीपर्यंत धावणार आहे. त्यामुळे मेट्रो पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत सुरु करण्याची मागणी चिंचवड, आकुर्डी, निगडी परिसरातील नागरिकांची होती. त्यानुसार महाराष्ट्र सरकारने 20 मार्च 2019 मध्ये निगडीपर्यंत मेट्रो नेण्याबाबतचा सविस्तर प्रकल्प अहवाल केंद्र सरकारकडे पाठविला आहे. निगडीपर्यंत मेट्रोसाठी 1048.22 कोटी रुपये खर्च येणार असल्याचे अहवालात म्हटले आहे.
पिंपरी ते भक्ती-शक्ती चौकपर्यंतच्या कॉरिडअरची लांबी 4.413 किलोमीटर आहे. त्यासाठी 1048 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यापैकी पिंपरी-चिंचवड महापालिका 122 कोटी रुपये देण्यास तयार आहे. याबाबतचा सविस्तर प्रस्ताव केंद्र सरकारकडे 20 मार्च 2019 रोजी पाठविला आहे. त्यासाठी एनडीएच्या नवीन सरकारच्या ‘100 दिन कार्यक्रमाअंतर्गत निगडीपर्यंतच्या मेट्रोच्या कामाला मान्यता द्यावी, अशी मागणी खासदार बारणे यांनी निवेदनातून केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.