Talegaon : राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनानिमित्त ‘मर्दानी महाराष्ट्राची’ उपक्रमांतर्गत 75 महिला कोरोना योद्धांचा सन्मान

75 women corona warriors honored under 'Mardani Maharashtrachi' initiative on the occasion of NCP's anniversary

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या संकल्पनेतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 21 व्या वर्धापनदिनाच्या निमित्त ‘मर्दानी महाराष्ट्राची’ या उपक्रमांतर्गत तळेगाव आणि परिसरातील अंगणवाडी सेविका, शिक्षिका,आशा वर्कर, तळेगाव दाभाडे प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व नर्स व महिला स्टाफ आणि महिला पोलीस कर्मचारी अशा विविध क्षेत्रातील 75 महिला कोरोना योद्धांचा सन्मान करण्यात आला.

तळेगाव दाभाडे येथील मारूती मंदिर चौकात तळेगावच्या उपनगराध्यक्षा वैशाली दाभाडे यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. अध्यक्षस्थानी कुलस्वामिनी महिला मंचच्या अध्यक्षा सारिका शेळके होत्या.

प्रमुख पाहुणे म्हणून संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष गणेश खांडगे, तळेगाव शहराध्यक्ष गणेश काकडे, माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी, गटनेते व ज्येष्ठ नगरसेवक किशोर भेगडे, अरूण माने, नगरसेविका मंगल भेगडे, संगीता शेळके, माजी नगराध्यक्षा माया भेगडे, तळेगाव शहर महिला राष्ट्रवादीच्या अध्यक्षा सुनिता काळोखे, कुलस्वामिनी महिला मंचच्या रेश्मा शेळके, नितीन जांभळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष आशिष खांडगे आदी उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते 75 महिला कोरोना योद्धांचा सन्मान करण्यात आला. सर्व सन्मार्थींना ‘मर्दानी महाराष्ट्राची’ या नावाने प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले.

हार, पुष्पगुच्छ व नारळ टाळून 1 सॅनिटीझर, 6 मास्क, 6 हात मोजे जोडे, 4 डेटॉल साबण आदी साहित्याच्या किटचे वाटप करण्यात आले.

आमच्या कार्याची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आमचा सन्मान केल्याबद्दल महिला कोरोना योद्धांनी यावेळी समाधान व्यक्त केले.

मावळ तालुक्यातील उर्वरित महिला कोरोना योद्धांचा सन्मान पुढील पाच दिवसात करण्यात येणार असल्याचे मुख्य संयोजक उपनगराध्यक्षा वैशाली दाभाडे यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे संयोजन उपनगराध्यक्षा वैशाली दाभाडे व तळेगाव महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षा ज्योती शिंदे, युवती अध्यक्षा निशा पवार, कार्याध्यक्षा रुपाली विनोद दाभाडे आदींनी केले.

प्रास्ताविक वैशाली दाभाडे यांनी केले. सूत्रसंचालन सुरेखा जाधव यांनी, तर आभार ज्योती शिंदे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.