Talegaon Dabhade: गुढी पाडव्याच्या श्री डोळसनाथ महाराज उत्सवातील सर्व कार्यक्रम रद्द

तळेगाव  दाभाडे – कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी  गुडीपाडव्याला होणा-या  ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज उत्सवातील सर्व कार्यक्रम  रद्द करण्यात आले आहेत.

 

तळेगाव दाभाडे नगर परिषद प्रशासन आणि ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज उत्सव समिती यांची संयुक्त सभा नगर परिषद सभागृहात नुकतीच झाली. त्या सभेत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आपत्ती व्यावस्थापनाबाबतचा आदेश सभेत वाचून दाखविण्यात आला. या अनुषंगाने वार्षिक यात्रा रद्द करण्यात आली.

 

यावेळी नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, मुख्याधिकारी दीपक झिंजाड, आरोग्य समिती सभापती सुलोचना आवारे, नगरसेवक निखील भगत, रवींद्र आवारे तर उत्सव समिती अध्यक्ष गोकुळ भेगडे, उपाध्यक्ष शुभम काकडे, सरचिटणीस निरंजन भेगडे, खजिनदार प्रणव भेगडे, सहखजिनदार गौरव परदेशी, प्रसिद्धी प्रमुख अश्विन माने आदी उपस्थित होते.

 

शासनाच्या आदेशानुसार  सभा, मेळावे, सामाजिक कार्यक्रम, जत्रा, यात्रा, उरूस,धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा,जलतरण तलाव, जिम, प्रेक्षागृह, नाट्यगृह,सिनेमागृह, माॅल, खाजगी कोचिंग क्लासेस, शाळा, महाविद्यालये दि. ३१ मार्च पर्यत जिल्हाधिकारी यांनी बंद ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यानुसार तळेगावचा ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज यांचा होणारा उत्सव रद्द करण्यात आला आहे.

ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज उत्सव रद्द झाल्याने या उत्सवासाठी येणारे फेरीवाले, खाद्यपदार्थ विक्रेते,पाळणे, चक्री, व लोकनाट्य तमाशा, भारुड, आर्केस्ट्रा, कुस्त्यांचा जंगी आखाडा आदी कार्यक्रम रद्द करण्यात आलेले आहेत.

 

तळेगावचा आठवडे बाजार बंद

 

शासनाच्या आदेशानुसार कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्या करिता दर रविवार आणि गुरुवारी भरणारा आठवडे बाजार बंद ठेवण्याचा आदेश मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांनी बजावला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.